किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती
By विजय मुंडे | Published: February 10, 2024 05:54 PM2024-02-10T17:54:24+5:302024-02-10T17:54:44+5:30
असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली.
जालना : साल्हेर किल्ल्यावरून दर्शन घेताना पाेलिस गडबड करीत होते. त्यामुळे खाली काही तरी गडबड असल्याचा संशय आला. खाली येताना अचानक टेम्पो वाहनांवर आला. त्यावेळी एकजण ओरडल्याने लोकं बाजूला झाली आणि दुर्घटना टळली. त्याला पोलिसांनी धरले. त्याने कोणाचेतरी नाव घेतले मला पिकअप घालायला सांगितल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना सांगितले आहे. असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून अंतरवाली येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरूस्ती करून सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवावे, एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा पारित करावा आदी मागण्यांसाठी आपण हे आमरण उपोषण सुरू केले आहे, असे जरांगे म्हणाले.
त्यांनीच पत्र द्यायला सांगितले असेल
मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, त्यांना कोणी धमकी देणार नाही. त्यांनीच कोणाला तरी पत्र द्यायला सांगितले असेल. त्यांच्या नेत्यांनी त्याला बळ दिल्यामुळे माझ्या जातीला त्रास होतोय. त्याला थांबविण्याचा विचार करा. जे आडमुठे आहेत, जे कोयत्याची भाषा करतात, जातींमध्ये भांडणे लावतात त्यांना पोलिसांचे संरक्षण आहे, त्यांच्यासाठी सरकार असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार
त्यांनी गोरगरिब ओबीसींसाठी भूमिका बदलावी. पडद्याच्या मागे राहून लेकरांचे वाटुळे केले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार. गोरगरिबांचे वाटोळे करण्याची नियत नाही. परंतु, लेकरांचे मुडदे पडायला लागले तर आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागणार असल्याचा पुर्नरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला.
गृहविभागाचे नवीन नियम
जे शांततेचे आवाहन करतात, कायद्याची मागणी प्रमाणिकपणे करते त्यासाठी सरकार नाही. जे आडमुठी मागणी करेल, जातीत तेढ निर्माण करेल, ओबीसी- मराठ्यात वाद लावतात त्यांच्यासाठी सरकार आहे. गृहविभागाचे नवीन नियम आलेत गुन्हे कोणाचे मागे घ्यायचे त्यांच्याकडे येणाऱ्यांचे, त्यांचे ऐकाऱ्यांचे, बाकीच्यांवर गुन्हे टाकायचे. घोटाळे करणाऱ्यांना सोबत घेवून फिरायचे असे नवीन नियम निघाल्याची टिकाही जरांगे पाटील यांनी केली.