पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:31+5:302021-05-13T04:30:31+5:30
जालना : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना काळात सर्वांत जास्त काम आरोग्य कर्मचारी व पोलीस ...
जालना : जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोना काळात सर्वांत जास्त काम आरोग्य कर्मचारी व पोलीस करीत आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही पोलीस व आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे. मात्र कर्तव्य बजावताना येणारा मानसिक थकवा घालविण्यासाठीही त्यांना स्वत:लाच प्रयत्न करावे लागत आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही.
डॉक्टर व कर्मचारी रात्रंदिवस कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. दुसरीकडे पोलीस प्रशासनही वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनच्या बंदोबस्तावर आहे. सतत काम असल्याने त्यांना मानसिक थकवा जाणवतो. यासाठी स्वत:च काही जण प्राणायाम, गाणे ऐकणे आणि कुटुंबीयांसोबत राहून आपला मानसिक थकवा दूर करीत आहेत. त्यांचा थकवा घालविण्यासाठी स्थानिक प्रशासनसाकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत.
आम्हाला आठ ते नऊ तास ड्युटी करावी लागते. सतत काम असल्याने मानसिक थकवा येतो. यासाठी मी नेहमी सकाळी प्राणायाम करते. कधी गाणे ऐकूण तर कधी कुटुंबीयांसोबत राहून आपला थकवा दूर करते.
पोलीस कर्मचारी
मागील वर्षभरापासून आम्हाला कुटुंबाला सांभाळून काम करावे लागत आहे. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. सतत बंदोबस्तात असल्याने मानसिक थकवा जाणवतो. यासाठी मी सकाळी व्यायाम करून ध्यानधारणा करतो. त्यामुळे थकवा दूर होतो.
पोलीस अधिकारी
मी मागील वर्षभरापासून कोरोना रुग्णांवर उपचार करते. ८ ते ९ तास ड्युटी करावी लागत असल्याने मानसिक थकवा जाणवतो. यासाठी मी गाणे ऐकते. तसेच सकाळी उठून नामस्मरण करते. वेळोवेळी डॉक्टरांचाही सल्ला घेते.
आरोग्य कर्मचारी
नोकरी व कुटुंब सांभाळताना मानसिक थकवा येतो.
मानसिक थकवा घालविण्यासाठी माझ्या मुलांसोबत राहतो. त्यांच्यासोबत राहून माझा थकवा दूर होतो. शिवाय दररोज सकाळी उठून व्यायाम करणे, गाणे ऐकणे आदी बाबी मी करतो.
आरोग्य कर्मचारी
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थकवा घालविण्यासाठी आम्ही साप्ताहिक सुट्टी देतो. तसेच वेळोवेळी त्यांचे मेडिकल चेकअप केले जाते. मानसिक थकवा जाणविल्यास त्या कर्मचाऱ्याला सुट्टी दिली जाते.
सुधीर खिरडकर, उपविभागीय अधिकारी, जालना,
आरोग्य कर्मचारी कुटुंबाला सांभाळून सतत काम करतात. या काळात त्यांना मानसिक थकवा जाणवतो. त्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी आपण त्यांना आठवड्यातून एक सुट्टी देतो. शिवाय वेगवेगळे कार्यक्रमही घेतले जातात.
अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना