कसे व्हावे आसवांचे व्यवस्थापन..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:38 AM2019-08-09T00:38:15+5:302019-08-09T00:39:02+5:30

अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे.

How to manage disasters ..? | कसे व्हावे आसवांचे व्यवस्थापन..?

कसे व्हावे आसवांचे व्यवस्थापन..?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अनेक शहरांमध्ये महापुरामुळे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली असली तरी जालन्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आसवांचे आपत्ती व्यवस्थापन कसे आणि कोणी करावे, हा यक्षप्रश्न कायम आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा प्रशासनाने जायकवाडी धरण भरल्यास गोदाकाठच्या ३८ गावांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा आढावा बैठकीत दिला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात गुरूवारी दुपारपर्यंत ६६.४४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या वरील क्षेत्रातून पाण्याची आवाक वाढली तर जायकवाडी प्रकल्प भरणार असून, त्यानंतर गोदावरी नदीपात्रातून जालना जिल्ह्यात पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी सोडले तर जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बळेगाव येथे पाणी पोहोचेल. तसेच अंबड मधील १७ गावे, घनसावंगी तालुक्यातील १७ व परतूर तालुक्यातील ५ अशा ३८ गावे नदीकाठी असून, पाण्याची आवक वाढली तर या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
ही शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे व प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, स्थानिक संस्था, मित्रमंडळांनीही आपत्ती काळात मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.
बैठकीत उपजिल्हाधिकारी राजू नंदकर यांनी जिल्ह्यात सद्यस्थित आवश्यक शोध व बचाव साहित्य असून प्रशासन धरणांच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. तसेच कोणत्याही आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांनी केले. बैठकीस तहसीलदार मनीषा मेने, डॉ. संदीप ढाकणे, नायब तहसीलदार स्नेहा कुहीरे, कोटूरकर, शेडोळकर, बी.के.चंडोळ, डॉ.विलास रोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कामात कोणत्याही विभागाने हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
आपत्ती काळात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, चुकीची माहिती, अफवा पसरवणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
पालकमंत्र्यांच्याही सूचना
जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, प्रकल्प भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय साथरोग पसरू नयेत यासाठी दक्षता घ्यावी, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: How to manage disasters ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.