आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:36 AM2024-06-21T11:36:17+5:302024-06-21T11:39:35+5:30

सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे. 

How to secure OBC reservation? Laxman Hake's question to the delegation; The meeting will be held in Mumbai today | आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

- पवन पवार 
वडीगोद्री( जालना) :
राज्य सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या भेटीला आज सकाळी वडीगोद्रीत दाखल झाले. शिष्टमंडळ आणि उपोषणार्थी यांच्यात सकाळी ९. ४४ वाजता चर्चा सुरू झाली. शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु  हाके उपोषणावर ठाम आहेत. यावेळी हाके यांनी, ओबीसी आरक्षण सुरक्षित कसे, हे आधी सांगा,  असा सवाल केला. सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे.

शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल होताच या सरकारच करायच काय, खाली मुंडक वर पाय, हे सरकार जातीवादी सरकार आहे, एकच पर्व ओबीसी सर्व,अशा घोषणा शिष्टमंडळ समोर देण्यात आल्या. चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, दोघांची तब्येत ढासळत चालली आहे. सरकार आपल्या पाठीशी उभ आहे. कुठेही ओबीसी समाजाला धक्का लागत नाही. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री यांच्या सोबत मागण्याबाबत चर्चा करू. तुम्ही तुमचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. त्याची नावे द्या, चर्चा करून प्रश्न सुटेल.  तसेच यावेळी मंत्री महाजन यांनी हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले. इथे बसून चर्चा संपणार नाही,  बैठकीनंतर मार्ग निघेल. मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करून अन् मार्ग निघेल कुणावरही अन्याय करायचा नाही,असे आश्वासन मंत्री महाजन यांनी हाके यांना दिले. त्यानंतर हाके यांनी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळास देत चर्चेची तयारी दर्शवली. आज सायंकाळी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात राज्य सरकार आणि हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. 

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी, मी आजपर्यंत माझ्या मागण्या मांडत आलो आहे. ओबीसी आरक्षणास कसा धक्का लागत नाही,  सगेसोयरेचे काय , हे सरकारने सांगाव, असा सवाल शिष्टमंडळास केला. येथे निवडणुकांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. हे महाराष्ट्रने पहिल्यांदाच पाहिले आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले नाही तर हे उपोषण सुरुच राहणार, असा इशारा हाके यांनी दिला. तसेच आम्ही लेखी घेतल्या शिवाय उपोषण सोडणार नाही. आमचा जीव गेले तरी चालेल. तुम्हीं सगळ्या लेकरांना सारख धराव, आमच्या २९  टक्क्याला कुठेही धक्का लागणार नाहीं हे लिहून द्यावं. मागच्या दाराने निघालेले ५७ लाख प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केली.

कोण असणार ओबीसी शिष्टमंडळात ?
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, महादेव जानकर सह स्थानिक कमिटीतील सदस्य या शिष्टमंडळात असणार आहेत.

Web Title: How to secure OBC reservation? Laxman Hake's question to the delegation; The meeting will be held in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.