HSC Result: बारावीतील मुलीच हुश्शार, जालना जिल्ह्याचा निकाल ९१.८८ टक्के
By विजय मुंडे | Published: May 25, 2023 08:46 PM2023-05-25T20:46:38+5:302023-05-25T20:46:57+5:30
टक्का घसरला : ९३ टक्के मुली तर ९० टक्के मुलं उत्तीर्ण
जालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा गुरूवारी निकाल जाहीर झाला. गतवर्षी ९३.९८ टक्क्यांवर असलेला निकाल यंदा घसरला असून, ९१.८८ टक्क्यांवर आला आहे. या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, ९३.८९ टक्के मुली तर ९०.५७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींविरूद्ध कारवाईही करण्यात आली होती. जिल्ह्यातील ३० हजार ६९३ परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात १८ हजार ५९० मुलं व १२ हजार १०३ मुलींचा समावेश होता. त्यातील २८ हजार २०२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ११ हजार ३६४ मुली तर १६ हजार ८३८ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्याचा एकूण सरासरी निकाल हा ९१.८८ टक्के लागला आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.९८ टक्के लागला होता. या निकालात दोन टक्क्यांनी घट झाली आहे. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण होताच परीक्षार्थींनी जल्लोष केला तसेच महाविद्यालयांच्या वतीनेही ठिकठिकाणी गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
४४ कॉपीबहाद्दरांवर झाली होती कारवाई
बारावीच्या परीक्षेेत जिल्ह्यातील ४४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली हाेती तर जालना जिल्ह्यात परीक्षेत्तर गैरमार्गाचे २३० प्रकरणे आढळून आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
३६ टक्के रिपिटरही उत्तीर्ण
फेब्रुवारी- मार्चमध्ये गतवर्षी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ६११ रिपिटर परीक्षार्थींनीही परीक्षा दिली होती. त्यातील २२५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ३६.८२ टक्के आहे. त्यात १६१ मुलं आणि ६४ मुलीही उत्तीर्ण झाल्या आहेत.
गत सहा वर्षांतील निकाल
वर्ष निकालाची टक्केवारी
फेब्रुवारी-मार्च २०१८- ८९.९०
फेब्रुवारी-मार्च २०१९- ८७.१२
फेब्रुवारी-मार्च २०२०- ९०.७२
फेब्रुवारी-मार्च २०२१- ९८.९७
फेब्रुवारी-मार्च २०२२- ९३.९८
फेब्रुवारी-मार्च २०२३- ९१.८८
असा आहे तालुक्यांचा निकला
तालुका टक्केवारी
जालना- ८८.५४
बदनापूर- ९३.१५
अंबड- ९१.७६
परतूर- ८५.३६
घनसावंगी- ९०.३२
मंठा- ८९.९८
भोकरदन- ९५.७९
जाफराबाद- ९३.०८