माणुसकी सर्वात मोठा धर्म- भास्कर महाराज देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 01:08 AM2019-07-18T01:08:04+5:302019-07-18T01:08:23+5:30
समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : गुरुपौर्णिमा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, ते व्हायलाच हवेत. सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. माणुसकी हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे. समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले.
जाफराबाद येथील श्री राधाकृष्ण नवनाथ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. भास्कर महाराज म्हणाले, अनाथ, गरजू आणि असहाय असलेल्या लोकांची सेवा करणे म्हणजे खरी मानवता आहे. मानवता सर्वात मोठा धर्म आहे. परमेश्वराने आपल्याला इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याकरता मानवाचा जन्म दिला आहे. आई-वडिलांची सेवा करणे हे आपल्या प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे, हे प्रत्येकाने पार पाडले पाहिजे. संस्काराने जीवन महान बनू शकते म्हणून जीवनात संस्कार अतिशय महत्त्वाचा असतो.
प्रारंभी भास्कर महाराजांनी त्यांचे गुरु प.पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. नंतर भजन, आरती, कीर्तन झाले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती होती.
गुरू आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा व प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आनंदी जीवन कसे जगावे शिकवतात. गुरू शब्दाचा अर्थच मुळात अंधार नाहीसा करणे, हा आहे. गुरू ज्ञानाचा सागर असतात. गुरूच्या कृपेनेच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ज्ञानप्राप्तीसाठी, जीवनात आत्मानंद मिळवण्यासाठी त्याला गुरूची आवश्यकता ही असतेच. गुरूशिवाय जीवन अपूर्णच आहे, असेही ते म्हणाले.