काळ्या आईच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोडल्या शंभर कोटींच्या ठेवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:27 AM2018-06-15T00:27:00+5:302018-06-15T00:27:00+5:30
शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतक-यांसाठी काळी आई अर्थात त्यांची शेतजमीन हीच असते. शेती जपण्यासाठी शेतकरी अहोरात्र घाम गाळून तिची मशागत करतो. मध्यंतरीच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतक-याने पोटाला चिमटे देऊन पै-पै.. करून जमा केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ शेतक-यांवर आली असून, गेल्या दीड वर्षात शेतक-यांचीच बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जवळपास शंभर कोटी रूपयांच्या ठेवी मोडल्याचे दिसून आले आहे.
भारत हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीचा एक, दोन एकरचा तुकडाही शेतक-यांसाठी लाखमोलाचा असतो. तो राबराब राबून त्या शेतीची मशागत करून, त्यात धान्यरूपी सोने पिकवतो. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत सापडली आहे. त्यातच शासनाच्या तुघलकी धोरणामुळे देखील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गेल्या दोन वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतक-यांनी विहीर खोदणे तसेच ठिबक सिंचनासह अन्य शेतीच्या कामासाठी कष्टातून जमवलेल्या ठेवी मोडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही बाबींसाठी अनुदान मिळत असताना शेतकºयांनी त्यांच्या ठेवी का मोडल्या, हा चिंतनाचा विषय आहे.
या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेत संपर्क साधला असता ठेवी काढणा-या शेतक-यांच्या अर्जाची बँकेने छाननी केली असता, ठेवलेल्या ठेवी या शेतीच्या विविध कामांसाठी मोडत असल्याचे नमूद केले आहे. अचानक एका वर्षात शंभर कोटी रूपयांच्या ठेवी कमी होणे हे बँकिंगसाठी किती धक्कादायक असते, हे नव्याने सांगणे नव्हे. या बँकेकडे गेल्यावर्षी एकूण ३८३ कोटी रूपयांच्या ठेवी होत्या. त्यात यंदा शंभर कोटी रूपयांची घट झाली आहे. या बॅकेत कुठल्याही अन्य संस्थांची खाते नसल्याने केवळ आणि केवळ शेतकºयांच्या या ठेवी असल्याचे सांगण्यात आले.
नेत्यांची आश्वासने वाºयावर
दीड वर्षापूर्वी या बँकेचे चेअरमन म्हणून मनोज मरकड यांची निवड झाली होती. त्यांच्या पदग्रहण समारंभास बँकेचे संचालक आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच आ. राजेश टोपे यांनी आमच्या वेगेवगळ्या संस्थां, कारखान्यांच्या ठेवी आम्ही या बँकेत ठेवू असे आश्वासन दिले होते. मात्र ते कोणीच पाळले नसल्याचे वास्तव आहे.
१०६ कोटींचा पीकविमा
जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीकविम्या पोटी १८ कोटी १० लाख रूपयांचा विम्याचा प्रिमियम भरला होता. त्या तुलनेत बँकेला १०६ कोटी रूपये मिळाले आहेत. जे की त्यांनी जवळपास ४ लाख ३६ हजार शेतक-यांच्या खात्यावर जमा केले आहेत. हा पीकविमा कोणत्या पिकांसाठी किती आला आहे, याचा तपशील विमा कंपनीने न दिल्याने संभ्रम कायम आहे. त्यातच हवामानावर आधारित फळ पीकविमा जिल्ह्यातील १९५२ शेतक-यांना मंजूर झाला असून, त्यापोटी आठ कोटी ७३ लाख रूपये मिळाले आहेत.