रेशीम कोषाने गाठला शंभर टनाचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:34 AM2019-01-13T00:34:35+5:302019-01-13T00:35:13+5:30
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला
संजय देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला असून, याची उलाढाल अडीच कोटी रूपयांच्या घरात पोहोचली आहे. कमी पाण्यात हमखास उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जात असून, तुती लागवडीकडेदेखील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात दहावर्षापासून रेशीम शेतीकडे शेतक-यांना वळविण्यासाठी सिंहाचा वाटा आहे, तो खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचा. त्यांनी दशकभरापूर्वी या रेशीम शेतीचे महत्व शेतक-यांना पटवून दिले. केवळ ते पटवूनच हे विज्ञान केंद्र थांबले नाही, तर तुतीची लागवड कशी करावी या संदर्भात थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. यासाठी रेशीम जिल्हा कार्यालयाचीही मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील सिंचनाचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन रेशीम लागवडीकडे शेतक-यांना वळवण्यासाठी मोठे परीश्रम घ्यावे लागले. त्या परिश्रमांचे आज चीज झाल्याचे समाधान शेतक-यांमध्ये दिसून येत आहे.
जालना जिल्ह्याला बियाणांची राजधानी म्हणून आधीपासूनच एक मोठी ओळख आहे. त्यात आता रेशीकोषाने आणखी भर घातली आहे. सध्या जिल्ह्यात ६०० एकरपेक्षा अधिक भूभागावर तुतीची लागवड केली जात आहे. त्यातून मिळणा-या रेशीम कोषाला जालना बाजारपेठेत सरासरी ३०० रूपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे.
कर्नाटकातील रामगनर येथे देखील जवळपास असेच दर मिळायचे. परंतु तेथे जाण्या-येण्यासाठी वेळ आणि लागणारा खर्च शेतक-यांचा वाचला आहे.
बाजारपेठेसाठीचे पाच कोटी पडून
जालन्यात रेशीमकोष खरेदीसाठी हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटी रूपयांची तरतूद दोन वर्षांपासून केली होती. परंतु त्यासाठी जागा आणि प्रारूप आराखडा तयार करण्यातच दोनवर्ष लोटले. शेतक-यांची गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर यांनी रेशीम कोष खरेदीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत जागा उपलब्ध करून देऊन प्रायोगिक तत्त्वावर नऊ महिन्यांपूर्वी ही कोष खरेदी सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
धागानिर्मिती केंद्र बंद
जालना जिल्ह्यात रेशीम कोष खरेदीसह कोषापासून रेशीमी धागा निर्मिती केंद्र तत्कालीन मंत्री आ. राजेश टोपे यांनी ५० लाख रूपये खर्च करून घनसावंगी येथे रेशीम धागानिर्मिती केंद्र उभारले होते. मात्र या ना त्या कारणाने हे केंद्र बंद पडले आहे. नंतर त्यांनी पाथरवाला येथेही दोन कोटी रूपये खर्चाचे अत्याधुनिक रेशीम धागा निर्मितीचा प्रस्ताव तयार केला होता. माात्र तो देखील अद्याप कागदावरच आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानही मिळत होते. मात्र अद्याप हे धागा निर्मिती केंद्र सुरू होऊ शकले नाही.