पानशेंद्रा शिवारातील शेकडो एकर फुलशेती दुष्काळामुळे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:40 AM2019-06-24T00:40:42+5:302019-06-24T00:41:34+5:30
दुष्काळी स्थितीचा फटका तालुक्यातील पानशेंद्रा येथील फुलशेतीला बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळी स्थितीचा फटका तालुक्यातील पानशेंद्रा येथील फुलशेतीला बसला आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्याने मुद्दलवार बंधूंंनी २० एकरावरील फुलशेती नांगरून घेतली. तर पानशेंद्रा व परिसरातील शेकडो एकरवरील फुलशेतीही पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहे.
पानशेंद्रा हे गाव फुलशेतीसाठी प्रसिध्द आहे. या लहानशा गावातील काही शेतकरी फुलांची शेती करतात. या गावच्या शिवारात कृष्णराव मुद्दलवार, चंद्रकांत मुद्दलवार व त्यांच्या भावंडांची वडिलोपार्जित जमीन आहे. मुद्दलवार कुटुंबीय २० एकरावर फुलशेती करतात. यात शेवंती, गलांडा, गुलाब, निशिगंध, झेंडू, मोगरा जरबेरा आदी विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. या शेतातील फुले पुणे, नागपूर, हैदराबाद, मुंबई, इंदौर आदी ठिकाणच्या बाजारात विकली जातात. जालना शहरातील बाजारपेठेतही पानशेंद्रा येथील फुलांची आवक होते.
मुद्दलवार यांच्या शेतात चार विहिरी, चार कूपनलिका आहेत. मात्र, दुष्काळामुळे या शेतातील जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी २० एकरावरील फुलशेती मोडीत निघाली आहे. गुलाबाची रोपंही जळून गेली आहेत. पाण्याअभावी फुलांची रोपं, झाडी वाळून गेली आहेत. त्यामुळे मुद्दलवार बंधूंनी शेतात नांगर फिरवून मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. यंदा चांगला पाऊस झाला तर पुन्हा फुलशेती करण्याचे नियोजन मुद्दलवार बंधूंनी केले आहे.
मुद्दलवार यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची फुलशेतीही दुष्काळामुळे मोडीत निघाली असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. फुलांच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेतील फुलांचे दरही वाढले आहेत.