चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शंभर स्मार्ट अंगणवाड्या सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:13+5:302021-09-26T04:32:13+5:30
जालना : चिमुकल्या मुलांची शैक्षणिक पायाभरणी करणाऱ्या जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे रूपडे स्मार्ट झाले आहे. जिल्हा परिषद महिला बाल विकास ...
जालना : चिमुकल्या मुलांची शैक्षणिक पायाभरणी करणाऱ्या जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे रूपडे स्मार्ट झाले आहे. जिल्हा परिषद महिला बाल विकास विभागाच्या वतीने शासकीय योजनेतून या अंगणवाड्यांना विविध शैक्षणिक साहित्यासह अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खासगी नर्सरीच्या धर्तीवर स्मार्ट झालेल्या शंभर अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यांचा शैक्षणिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात जवळपास १७०० वर अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमधून मुलांना अक्षर ओळख करून देण्यासह त्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रमही राबविले जात आहेत. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी अंगणवाडी ताई, मदतनीस, आशा कार्यकर्ती आदींच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील चिमुकल्या मुलांसह गरोदर माता, महिलांना दिला जात आहे. लहान मुलांचे वजन, उंची मोजण्यासह त्यांची इतर वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात खासगी नर्सरीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पालकांचा ओढा अंगणवाड्या ऐवजी नर्सरीकडे वळताना दिसत आहे. ही बाब पाहता शासनाने अंगणवाड्यांना स्मार्ट रूप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जालना जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत शंभर अंगणवाड्यांची निवड करण्यात आली होती.
स्मार्ट अंगणवाडी या संकल्पनेत अंगणवाडीची रंगरंगोटी, चिमुकल्यांसाठी टेबल, खुर्च्या, टीव्ही., सोलार, वॉशबेसिन, शैक्षणिक साहित्याची कीट यासह इतर १५ ते १६ प्रकारचे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या स्मार्ट अंगणवाड्यांचे कामही पूर्ण झाले असून, या कामामुळे अंगणवाड्यांमध्ये आकर्षक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाकडून अंगणवाड्या सुरू करण्यास कधी हिरवा कंदील मिळतो आणि या स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्या मुलांचे स्वागत कधी होते याची प्रतीक्षा अंगणवाडी ताईनां लागली आहे.
कोट
चिमुकल्या मुलांचा बौद्धिक, शारीरिक, सामाजिक विकास करण्यासाठी अंगणवाड्यांमधून काम केले जाते. जिल्ह्यातील शंभर अंगणवाड्यांचे स्मार्ट अंगणवाडीत रूपांतर करण्यात आले आहे. या अंगणवाड्यांमुळे चिमुकल्या मुलांना उत्साही वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.
एस.डी. लोंढे, महिला बालविकास अधिकारी जि.प. जालना
कोट
फोटो
तालुका स्मार्ट अंगणवाड्या
भोकरदन १६
जाफराबाद ०८
अंबड १६
मंठा ०८
परतूर ०८
बदनापूर ०८
जालना १६
घनसावंगी २०
एकूण १००