जगण्याच्या हुंकाराचे साहित्य चिरकाल टिकते - रावसाहेब ढवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:59 AM2018-12-02T00:59:54+5:302018-12-02T01:00:27+5:30
सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले.
अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशदिनानिमित्त जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेत निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवीसंमेलनाचे उद्घाटन उस्मानाबाद येथील विचारवं प्रा. राजा जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे, रमेश देहेडकर, अशोक साबळे, डॉ. सुहास सदाव्रते, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन बोरूडे, विठ्ठल वरपे, परमेश्वर बोरूडे, सचिव कैलास भाले, राम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिकांचे कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनात चला गावाकडं धनी या कवितेतून कवी नारायण खरात यांनी बदलत्या सामाजिक घटनांचा परामर्श मांडला. अॅड. कैलास रत्नपारखे यांनी ‘भीमा कोरेगाव’ या ऐतिहासिक गावाचा संदर्भत देत वास्तवातील घटनांवर परखड भाष्य केले. कवी जीजा जाधव यांनी सादर केलेल्या ‘सोडा रे आता वृत्ती सोडा’ या कवितेतून माणसातील विविध वृत्ती प्रवृत्तीवर विडंबनात्मक भाष्य केले. प्रा. अशोक खेडकर यांनी सादर केलेल्या या दगडाचा ठाव घेतला पाहिजे या कवितेतून ढोंगी वागण्यावर शब्दातून चांगलेच फटकारले.
कवीसंमेलनात प्रा. एकनाथ शिंदे, राहुल गवई, साहिल पाटील, सुधाकर चिंधोटे, सुनील लोणकर, प्रा. माधव जाधव, प्रा. मधुकर जाधव, प्रा. बी. जी. श्रीरामे, संजयकुमार सरदार, मनीष पाटील यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर दाते तर आभार डॉ. विजयकुमार कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. डी. एम. जानराव, डॉ. के. जी. सूर्यवंशी, संजय हेरकर, इलियास मोहिओद्दीन, नवनाथ लोखंडे, वंदना भालेराव, किरण कांबळे आदींनी परिश्रम घेतले.