नवरा-बायकाेचा वाद मिटवायला आले अन् हाणामारी करून बसले; ११ जणांवर गुन्हा
By महेश गायकवाड | Published: March 25, 2023 03:08 PM2023-03-25T15:08:47+5:302023-03-25T15:08:59+5:30
दोन्ही गटांत झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
मंठा: सून सासरी नांदत नसल्याने घरातील वाद मिटविण्यासाठी सासर आणि माहेरकडील नातेवाईक बैठकीसाठी आले; पण वाद मिटविण्याच्या नादात दोन्हीकडील नातेवाइकांत काठ्या आणि दगडांनी हाणामारी झाली. यात काहीजण गंभीर जखमी झाले. ही घटना मंठा शहरातील तळणी फाटा येथे २४ मार्च रोजी घडली. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची माहिती अशी की, मंठा तालुक्यातील शिरपूर येथील मनोहर शिरसाट यांचा जवळा येथील राजबिंडे कुटुंबातील मुलीशी विवाह झालेला आहे. लग्नानंतर बायको नांदत नसल्याने घरात वाद-विवाद वाढले होते. हा वाद आपापसात मिटविण्यासाठी २४ मार्च रोजी शिरसाट व राजबिंडे कुटुंबातील व्यक्तींची तळणी फाटा येथील मंगल कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत घटस्फोट घेऊन वाद मिटविण्याची चर्चा झाली.
यावेळी विवाहितेकडील नातेवाइकांनी लग्नातील खर्च देऊन घटस्पोट द्या, अशी मागणी केली. यावर दोन्ही गटांत झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आणि वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांत काठ्या, दगड व लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर मंठा पोलिस ठाण्यात दोन्हीकडील नातेवाइकांनी परस्परविरोधी तक्रार दिली. या तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत व पोहेका चव्हाण हे करीत आहेत.