शेतात जाताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

By विजय मुंडे  | Published: December 18, 2023 07:32 PM2023-12-18T19:32:21+5:302023-12-18T19:33:07+5:30

अपघातानंतर पळून जणाऱ्या कार चालकाला ग्रामस्थांनी पकडले

Husband dies in collision with speeding car, wife seriously injured | शेतात जाताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

शेतात जाताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

केदारखेडा : शेतात निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला एका भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून, मयताची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कारसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. ही घटना सोमवारी सकाळी केदारखेडा-भोकरदन मार्गावरील जवखेडा ठोंबरे पाटीवर घडली.

शिवाजी पुंडलिक जाधव (वय ४८ रा. वालसा डावरगाव) असे मयताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई शिवाजी जाधव (वय-४४) या गंभीर जखमी झाल्या. वालसा डावरगाव येथील शिवाजी जाधव व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई जाधव हे दाम्पत्य सोमवारी सकाळी दुचाकीवरून शेताकडे जात होते. जवखेडा ठोंबरे पाटीवर पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (क्र.एम.एच.१९-ए.एक्स.६३५३) दुचाकीला जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी जाधव यांना उपचारासाठी जालन्याकडे नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी लक्ष्मीबाई जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मयताच्या पार्थिवावर सोमवारी रात्री वालसा डावरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील असा मोठा परिवार आहे.

Web Title: Husband dies in collision with speeding car, wife seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.