महाकाळा येथे पत्नीने केला पतीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:18 AM2019-06-25T00:18:57+5:302019-06-25T00:19:29+5:30
एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळा (जि.जालना) येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंकुशनगर : एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळा (जि.जालना) येथे घडली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक जिजा मुळे (६०) असे मयताचे नाव आहे.
महाकाळा येथील माणिक जिजा मुळे यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी सत्यभामा या माहेरी गेल्या होत्या. तर माणिक मुळे व त्यांची दुसरी पत्नी शारदा हे दोघे रविवारी रात्री घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास पतीला कोणीतरी माणसे मारत असल्याचे सांगत शारदा मुळे या गावचे पोलीस पाटील राजेंद्र कव्हाळे यांच्याकडे धावत गेल्या. कव्हाळे व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता माणिक मुळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि शिवानंद देवकर, पोउपनि हनुमंत वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचरण करण्यात आले. मात्र, माग काढण्यासाठी श्वानाला कोणीही वस्तू आढळली नाही. घराचे दरवाजे, कड्या तुटलेले आढळून न आल्याने हा बनाव असल्याचा संशय घेत पोलिसांनी शारदा मुळे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच शारदा मुळे यांनी आपण पतीच्या डोक्यात अवजड किंवा कोणत्या तरी लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मयताची पहिली पत्नी सत्यभामा मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शारदा मुळे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपत्तीच्या वादातून कृत्य
महाकाळा येथील माणिक जिजा मुळे यांना गावच्या शिवारात १२ एकर शेती आहे. लग्नानंतर त्यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पहिल्या लग्नानंतर पंधरा वर्षानंतर दुसरे लग्न केले.
ब्मात्र, तरीही त्यांना मुलबाळ झाले नाही. दोन लग्नानंतरही मूलबाळ होत नसल्याने एखादे मूल दत्तक घेण्याची चर्चा माणिक मुळे करीत होते. त्यामुळे संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.