शिवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:56 PM2018-02-13T22:56:51+5:302018-02-13T22:57:25+5:30
जालना शहर व जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जालना : जालना शहर व जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिरांमध्ये मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची सकाळपासूनच गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नवीन जालन्यातील पंचमुखी महादेव मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. मंदिर व्यवस्थापनाने महिला व पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा केल्या होत्या. पहाटे महाभिषेक झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी मंदिर परिसरात फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम असल्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. वाहतूक व्यवस्था व सुरक्षेसाठी या परिसरात ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.
शहरातील ढवळेश्वर महादेव मंदिरासह जुन्या जालन्यातील अमृतेश्वर शिव मंदिर, मुक्तेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर मंदिर, आनंदीस्वामी मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथील डोंगरात असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरात गोंदेगाव, वंजारउम्रद, माळेगाव, वरखेड, बावणेपांगरी, दगडवाडी इ. गावांमधील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
------------
जालना शहरापासून काही अंतरावर असलेल्या भोलेश्वर बरडी संस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०८ कुंडी यज्ञ सोहळा झाला. मंदिरात दर्शनासाठी परिसरातील शेकडो भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले.