मराठवाड्याच्या वीरभूमीला मी वंदन करतो - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:02 AM2019-10-17T01:02:02+5:302019-10-17T01:02:33+5:30

भारत माता की जय.. इथे उपस्थित या विशाल जनसागराला माझा नमस्कार.. मराठवाड्याच्या या वीर भूमीला मी वंदन करतो... असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकली.

I bow to the heroic field of Marathwada - Narendra Modi | मराठवाड्याच्या वीरभूमीला मी वंदन करतो - नरेंद्र मोदी

मराठवाड्याच्या वीरभूमीला मी वंदन करतो - नरेंद्र मोदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / परतूर : भारत माता की जय.. इथे उपस्थित या विशाल जनसागराला माझा नमस्कार.. मराठवाड्याच्या या वीर भूमीला मी वंदन करतो... असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवित आघाडी सरकारच्या तत्कालीन कामकाजाचा समाचार घेतला. उपस्थित जनसागराने पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे मोदी यांनी सांगताच उपस्थितांनी मोदीऽऽ मोदीऽऽ चा जयघोष केला. मोदी यांनी स्थानिक विशेषत: मराठवाड्याच्या प्रश्नांना हात घालत मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्याची ग्वाही दिली.
परतूर येथील बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्ते, वाहनांनी परतूर शहर भाजपमय झाले होते. शहरातील सर्व रस्ते आणि गल्ल्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. मिळेल त्या मार्गाने नागरिक सभास्थळी जाताना दिसून आले. वाहनांचा प्रचंड ताफा नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. सभास्थळापासून एक किलोमीटर दूर पार्किंगची व्यवस्था केली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून मोदींसह अन्य नेत्यांचे आगमन झाले. हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था सभास्थळाजवळच करण्यात आल्याने हेलिकॉप्टर दिसताच उपस्थितांनी मोदीऽऽ मोदीऽऽच्या घोषणा देऊन उभे राहत त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर आगमन होताच मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत हात वर करून नागरिकांना अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोदींनी हात जोडून नमस्कार केला. व्यासपीठावर बसल्यानंतर मोदी यांना भेटण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मेघना बोर्डीकर, हिकमत उढाण, मोहन फड, खा. संजय जाधव यांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करून परिचय दिला. मोदी यावेळी अत्यंत आस्थेवाईकपणे त्यांचे म्हणणे ऐकूण घेत होते. परतूर मतदार संघात बंजारा समाजाचे मोठे मतदान आहे. ही बाब लक्षात घेऊन मोदी यांनी बंजारा समाजाचा आपल्या भाषणातून विशेष उल्लेख केला. बंजारा समाजाचे सर्व प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले. या त्यांच्या घोषणेचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले.
जवळपास ४० मिनिटे मोदी यांनी आपल्या ओघवत्या भाषेत मार्गदर्शन केले. केंद्र, राज्य शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा उहापोहही त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे ए.जे.बोराडे, मोहन अग्रवाल, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, रामेश्वर भांदरगे, आदींची उपस्थिती होती. मोदींचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर राहुल लोणीकरांनी जोरदार घोषणा देऊन उत्साह भरला होता.
एनर्जी आणता कोठून ?- खोतकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी परतूर दौ-यावर होते. यावेळी व्यासपिठावर त्यांच्या शेजारी असलेल्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांच्याशी हितगुज केली. यावेळी ‘आप इतनी एनर्जी कहाँ से लाते हो’, असे विचारल्यावर मोदी यांनी मिश्किल हस्य करून योग साधना आणि नैसर्गिक उत्साह आपल्याला ऊर्जा देत असल्याचे सांगितले. याचवेळी ‘शिवसेने का कैसा चल रहा है’, असे विचारून सद्यस्थितीची माहिती मोदींनी जाणून घेतली. आपण सलग सात वेळा निवडणूक रिंगणात आणि ते ही शिवसेनेकडूनच असल्याचे खोतकर यांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
२५० जागा येणार- रावसाहेब दानवे
केंद्र व राज्यातील सरकाने गत पाच वर्षात केलेली विकास कामे जनता विसरणार नाही. १५ वर्षात जे काँग्रेस- राष्ट्रवादीने केले नाही, ते आम्ही पाच वर्षाच्या काळात करून दाखविले. शेतकरी, कामगार आणि जवळपास सर्वांचीच काळजी आम्ही घेतली, असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला २५० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही दानवे यांनी केला.
दुष्काळमुक्तीसाठी केंद्राकडून भरीव मदत- लोणीकर
मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासह शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जवळपास ५० हजार कोटी रूपयांचा निधी दिल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वॉटरग्रीड तसेच कोकणातील पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी अनुक्रमे २० हजार आणि ३२ हजार कोटी रूपये निधीचा आराखडा तयार आहे. वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्यात हरितक्रांती होऊन या वॉटर ग्रीडच्या पथदर्शक प्रकल्पाची जवळपास १७२ गावात कामे सुरू आहेत. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात ४ हजार ७०० कोटी रूपये मिळाले आहेत. शेगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गासाठी २ हजार कोटी रूपये मिळाल्याचे लोणीकर म्हणाले.एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले निमंत्रण स्वीकारल्या बद्दल त्यांचे आभार मानले. मतदारांकडून मिळणारा आजचा हा प्रतिसाद आपल्यासाठी अविस्मरणीय राहणार आहे. यावेळी मोंदीचा सत्कार काठी आणि घोंगडी देऊन करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य राहुल लोणीकर यांचीही उपस्थिती होती.

Web Title: I bow to the heroic field of Marathwada - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.