जगण्यासाठी मला कवितेतून प्रेरणा मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:34 AM2018-01-07T00:34:25+5:302018-01-07T00:34:37+5:30
आयाबायांचे दु:ख बघून ते कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहे. त्यामुळे मलाही जगण्यासाठी आणि खंबीरपणे उभे राहण्यासाठी कविता प्रेरणा देत असल्याचे मत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी व्यक्त केले.
जालना : आयाबायांचे दु:ख बघून ते कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहे. त्यामुळे मलाही जगण्यासाठी आणि खंबीरपणे उभे राहण्यासाठी कविता प्रेरणा देत असल्याचे मत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी व्यक्त केले.
फकिरा सेवाभावी संस्थेच्या वतीने वेणुताई भाले मुद्रा साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कवयित्री दुधाळ यांचा राज्यस्तरीय वेणूताई भाले मुद्रा साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अमरावी येथील समीक्षक डॉ. मनोज तायडे, प्राचार्य गजानन जाधव, संयोजक कैलास भाले, राम गायकवाड, विश्वनाथ भाले, विमल कांबळे, डॉ. शशिकांत पाटील, रमेश देहेडकर उपस्थित होते.
यावेळी समीक्षक डॉ. मनोज तायडे कल्पना दुधाळ, डॉ. शशिकांत पाटील यांच्या हस्ते कवी राम गायकवाड लिखित ‘उसवतांना’ या कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जीवनाच्या परिघातील माणसांमाणसातील जगण्याचे संदर्भ त्यांचे नाटकीपण, वास्तवता आणि बेरकीपणावर भाष्य करणा-या कविता सदर कवी संग्रहात असल्याचे समिक्षकांनी सांगितले. प्राचार्य गजानन जाधव यांनी मुद्रा या राज्यस्तरीय पुरस्कारामागची भूमिका विशद केली. यावेळी गझलकार डॉ. शेख इकबाल मिन्ने यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले.