"मी सांगतो हेच सत्य", जरांगे पाटील रुग्णालयातून बाहेर; ओबीसी नेत्यांवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 06:51 PM2023-11-12T18:51:10+5:302023-11-12T19:57:48+5:30
४० दिवसाच्या खंडानंतर तब्बल नऊ दिवसांच्या उपोषणाने प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
जालना/मुंबई - मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषणस्थळावरुन थेट रुग्णालयात नेण्यात आले. २ नोव्हेंबरपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेतलेले मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना आज दिवाळीदिनीच १२ नोव्हेंबर रोजी सुट्टी देण्यात आली. मागील दहा दिवस डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर त्यांचे वजन ८ किलो वाढले. यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांना लक्ष्य केलं. तसेच, सर्वसामान्य ओबीसी समाजातील लोकांच्या भावना, मी सांगतो ह्याच आहेत, असेही ते म्हणाले.
४० दिवसाच्या खंडानंतर तब्बल नऊ दिवसांच्या उपोषणाने प्रकृती खालवल्याने जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून बाहेर येताच, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतिषबाजी करीत आणि एक मराठा, लाख मराठा च्या घोषणा देत त्यांचे रुग्णालयाबाहेर स्वागत केले. दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, पुढील दिशा सांगताना आणि ओबीसी नेत्यांना लक्ष्य केलं. आता ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करुन वातावरण बिघडवलंय नाही पाहिजे, असं सगळ्या ओबीसी बांधवांना वाटतं. यांच्या राजकीय हट्टापायी त्यांनी सामान्य ओबीसींना वेठीस धरु नये, त्यांना नोंदी मिळाल्या आहेत, तर गोरगरीब मराठ्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे, असं सगळ्यांना वाटतं आणि मे मी सांगतो हेच सत्य आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यावर ते ठाम आहेत. आपण दिवाळी साजरी करणार नाही, अंतरवाली सराटी येथे जाऊन ते पुढील दौऱ्यासंदर्भात समर्थकांशी चर्चा करत आहेत.