चोरीच्या दुचाकी १५ हजारांत सौदा करायचे... पाच हजार घ्यायचे अन् धूम ठोकायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:47+5:302021-08-01T04:27:47+5:30
जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरून १५ हजारांत सौदा करायचे... पाच हजार घ्यायचे अन् कागदपत्र नंतर देतो म्हणून ...
जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरून १५ हजारांत सौदा करायचे... पाच हजार घ्यायचे अन् कागदपत्र नंतर देतो म्हणून धूम ठोकणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली आहे. दिनेश दत्तात्रय पवार (रा. कसबा), वैभव सूर्यकांत एखंडे (रा. पुष्पकनगर), सचिन आबासाहेब काकडे (रा. जयपूर, ता. मंठा), अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वीच शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी केल्या असून, सदरील दुचाकी दिनेश पवार याने चोरल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने साथीदार वैभव एखंडे, सचिन काकडे यांच्यासह चोरल्याची कबुली दिली. त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, तिन्ही आरोपी शहरातील विविध भागांतून दुचाकींची चोरी करून त्यांची ५ हजार रुपयांत विक्री करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. दुर्गेश राजपूत, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, साग बाविस्कर, सचिन चौधरी, रवी जाधव, सूरज साठे यांनी केली आहे.