तेव्हा सरकारचा 'कार्यक्रम' केला म्हणून आज या कार्यक्रमास आलो, मुख्यमंत्र्यांचा मिश्कील टोला
By संजय देशमुख | Published: February 2, 2023 06:22 PM2023-02-02T18:22:27+5:302023-02-02T18:27:44+5:30
जलतारा प्रकल्पाला शासनाचे सहकार्य: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
जालना : शेतकऱ्यांना पाणीदार बनविणारा आर्ट ऑफ लिव्हिंगचा जलतारा प्रकल्प हा अत्यंत क्रांतीकारी प्रकल्प आहे. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासह आत्महत्या थांबण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारचे पूर्णत: ते सहकार्य राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, 'तेव्हा सरकारचा कार्यक्रम केल्याने' आजच्या या जलतारा कार्यक्रमास येवू शकलो, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वाटूर फाटा (ता.परतूर) येथे गुरूवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, मंत्री उदय सावंत, आ. संजय सिरसाट, अभिमन्यू खोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, पूर्वीच्या शासनाने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना आम्ही सुरू केली. त्यामुळे जलसंधारण वाढत आहे. वॉटर ग्रीड योजनाही पूर्ववत करण्यात आली असून, त्याची चांगली अंमलबजावणी होत आहे. गुवाहाटी गेल्याचा किस्सा सांगून तेथेही श्री श्री रविशंकर यांचा आशीर्वादाचा फोन आल्याचे आवर्जुन सांगितले. 'तेव्हा सरकारचा कार्यक्रम केल्याने' आजच्या या जलतारा कार्यक्रमास येवू शकलो, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. भविष्यात महाराष्ट्रात गुंतवणूक वाढीसह रोजगार वाढीला प्राधान्य देणार असल्याची घोषणा आम्ही दाओसहून आल्यानंतर केली. त्यामुळे राज्यात गुंतवणूक वाढून उद्योग, धंदे विकसित होतील, असेही ते म्हणाले.
चिंता करू नका, तणावमुक्त व्हा
श्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तणावमुक्त व्हावा, चिंता करू नका. जीवनात सुख- दु:ख येत असतात. त्यांना दूर करण्यासाठी ध्यान साधनाही महत्त्वाची आहे. आर्टट ॲफ लिव्हिंगच्या माध्यमातून जलतारा प्रकल्प देशातील एक लाख गावात राबविण्याची घोषणाही श्री श्री रविशंकर यांनी केली.