"मी हटणार नाही"; श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:20 PM2024-09-09T15:20:34+5:302024-09-09T15:22:11+5:30
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : "मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही." , अशी स्पष्ट भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, "मी फडणवीस यांना शत्रू किंवा विरोधक मानत नाही, परंतु सत्ताधारी तुम्ही आहात आणि तुम्हालाच आरक्षणाची मागणी मान्य करावी लागेल."
जरांगे पाटील यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना पुढे म्हटले, "मी गरिबांचं काम करतो, तुम्ही श्रीमंत मराठे. तुम्ही जाणून-बुजून मला टार्गेट करायला लागले आहात." त्यांनी सांगितले की, मराठा समाज त्यांच्या मागे एकत्र आहे, कारण त्यांना कळतंय की मी त्यांच्यासाठी लढतोय. राज्यातील प्रत्येक गावात एकमेकांच्या मदतीसाठी उभे राहतील अशा मराठा सेवकांच्या संघटना उभा करण्याचे आवाहन देखील जरांगे यांनी यावेळी केले.
आंदोलनावरून त्यांनी सरकारवर टीका केली, "आंदोलन कोणीही केलं तरी सरकारलाच मागणार ना, जनतेला नाही." तसेच आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या विधानावर टीका करताना जरांगे म्हणाले, "काही आमदार म्हणतायत की मराठ्यांना ओबीसी आरक्षण नाही पाहिजे, तर त्यांनी हेच काम करावं, दुसऱ्या कशाला काड्या करतायत?"
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, "तुम्ही जर प्रत्येकवेळेस आमच्यावर षडयंत्र करत राहाल, तर जनतेच्या समस्यांचे निराकरण कसे होईल? मी गरिबांचे प्रश्न मांडतोय, आणि जर हा अहंकार वाटत असेल, तर तो अहंकारच आहे." आंदोलनाच्या बाबतीत बोलताना, त्यांनी सांगितले की, "मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, हे मागणे अधिवेशनात ठरवले जावे. जे आमदार मराठ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतील, त्यांना समाजातून विरोध होईल."
जरांगे यांनी बार्शी येथे झालेल्या मराठा कार्यकर्त्यावर झालेल्या मारहाणीवरही प्रतिक्रिया दिली. "कोणाच्याही लेकरावर हात उचलायचा नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले आणि त्याच्या डोळ्यातील पाण्याचा हिशोब होईल, असा इशारा दिला. याप्रसंगी जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना देखील आव्हान दिले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी एकत्र येऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागेल.