विज्ञान पेरणारा जालन्याचा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:55 PM2020-02-29T23:55:18+5:302020-02-29T23:58:05+5:30
विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शहरातील एका अवलियाने पुढाकार घेतला आहे. संजय टिकारिया असे या अवलियाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाविज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शहरातील एका अवलियाने पुढाकार घेतला आहे. संजय टिकारिया असे या अवलियाचे नाव असून, त्यांनी आजवर देशभरात सरासरी एक लाख विद्यार्थी व शिक्षकांमध्येविज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम केले आहे.
‘चला आपणच प्रयोग करू’ ही संकल्पना टिकारिया यांची आहे. साध्या टाकाऊ वस्तूपासून प्रयोग करणे, घरगुती साहित्यातून शालेय प्रयोग तयार करणे, यातून विद्यार्थ्यांना अवघड वाटणार विज्ञान विषय सोपा करून दाखविण्याची कसब टिकारिया वापरतात. ते शहरातील सीटीएमके शाळेत प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत आहेत. घरगुती साहित्यातून शालेय प्रयोग कसे तयार करावेत, याविषयी ते नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कमी खर्चामध्ये शाळेत लॅब उभारणे यासाठी टिकारिया नेहमी विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या शाळेने त्यांना निमंत्रित करताच ते स्वखर्चाने जातात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याचे कोणतेही मानधन घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दहा ते एकरा वर्षांपूर्वी टिकारिया सिंगापूर अभ्यास दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी ३०० ते ५०० रुपयांमधून बनविलेल्या ‘माझी छोटीशी प्रयोगशाळा’ या पेटीतील त्यांची संकल्पना उपस्थितांना सांगितली. त्यांची ही संकल्पना सर्वांनाच भावली. यानंतर परदेशातील ही शिक्षकांनी ती पेटी तयार केली.
प्रयोगशाळा सहायकपदी
संजय टिकारिया मूळचे जालना शहराचेच. त्यांचे वडील सीटीएमके विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या संजय यांनी जालन्यातच एक किराणा दुकान सुरू केले. परंतु, काही कारणात्सव त्यांच्या कुटुंबाला १९८७ साली चिखली येथे स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, काही दिवसांमध्येच पुन्हा दिवस फिरले आणि टिकारिया कुटुंब १९९१ मध्ये पुन्हा जालन्यात आले. १९९२ मध्ये सीटीएमके विद्यालयात प्रयोगशाळा सहायकपदी संजय टिकारिया यांची नियुक्ती झाली.