आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षणास चॅलेंज करू: मनोज जरांगे
By विजय मुंडे | Published: February 1, 2024 11:45 AM2024-02-01T11:45:34+5:302024-02-01T11:46:20+5:30
मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे.
जालना : सग्यासोऱ्यांबाबत अध्यादेश निघाला असून, त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. मुंबईला गेल्यानंतर आम्हाला तो अध्यादेश मिळाला. मराठा समाजातील अभ्यासकांनी सोशल मीडियावर लिहिण्यापेक्षा अंतरवाली सराटीत येवून म्हणणे मांडावे. तुमचे शब्द त्या कायद्यात घ्यायला, सरकारला सांगू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे आणि आपण ते करू, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश निघाला असून, त्यावर हरकती मागितल्या आहेत. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी १० फेब्रुवारी रोजी उपोषण सुरू केले जाणार आहे. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्याने गॅझेट घेण्याबाबतची मागणी आहे. साडेतीन महिन्यांपासून सगेसोयऱ्यांबाबतची मागणी आहे. त्यावेळी तुम्हाला योग्य वाटत होते. आता ते मिळाले तर मुंबईला जावून हाती काय पडले अशी विचारणा सोशल मीडियावर केली जात आहे. गोरगरिबांच्या हाताला आरक्षणाच्या कायद्यासाठी लागणारा अध्यादेश लागला. परंतु, त्यांच्या हाताला काही नाही लागले. पद, पैसा नाही लागला. ते आम्ही मिळू देणार नाही. आयुष्यभर तुमचे दुकान बंद. आरक्षणाची नोंद न मिळालेल्यांना आरक्षण मिळणार आहे. आमच्या आरक्षणात काही झाले तर देशातील २७ टक्के आरक्षण चॅलेंज करावे लागणार आहे आणि आपण ते करू, असेही जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही फक्त चष्म्याच्या काचा बदला
ओबीसींच्या घरासमोर उन्मादी उत्सव साजरा केला जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केल्याच्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, कोणाच्या घरासमोर केला. ओबीसींची घरे आमचे आहेत. ओबीसी आमच्यात गुलाल घेवून नाचतात. एकदा कायद्याची अंमलबजावणी होवून सग्यासोऱ्यांच्या मार्फत प्रमाणपत्र मिळाले ना तुम्ही महादिवाळी बघा अन् विजयाची महासभा बघा. तुम्हाला खूप बघायचे आहे. चष्म्याच्या काचा बदलीत रहा फक्त. काहीही केले तरी मराठा आरक्षणात जाणार आहे. त्यामुळे भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये वाद लावू नये, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.