औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:21 PM2022-04-26T14:21:07+5:302022-04-26T14:21:51+5:30
आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात.
जालना : केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद ते पुणे या नवीन दहा हजार कोटींच्या रस्त्याची घोषणा केली आहे. ती स्वागतार्ह आहे; परंतु हा महामार्ग जालन्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज पॉइंटला जोडल्यास त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील जनतेस होईल, अशी मागणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नितीन गडकरींकडे केली आहे.
गडकरी हे नुकतेच औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी औरंगाबाद ते पुणे या नवीन महामार्गाची घोषणा केली. हा महामार्ग नॅशनल हायवे ॲथोरटी ऑफ इंडियाकडून करण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यानुसार या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपये लागणार असून, हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर केवळ दीड ते दाेन तासांत कापता येणे शक्य होणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे भविष्याचा विचार करता गडकरींची यातून दूरदृष्टीच दिसून येते. परंतु, त्यांनी केवळ हा मार्ग औरंगाबाद ते पुणे असा प्रस्तावित केला आहे. तोच मार्ग जालन्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग अर्थात समृद्धी महार्गाच्या जालन्यातील इंटरचेंज पाँईटला जोडल्यास तो अधिक लाभदायी होऊन नागरिकांना दिलासा मिळून त्यांच्या वेळेची बचत होईल, असेही खोतकरांनी गडकरींना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मेट्रोही जालन्यापर्यंत आणावी
स्मार्टसिटी अंतर्गत शेंद्रा ते वाळूज हा मेट्रोमार्ग प्रस्तावित केला असून, त्याचे भूमिपूजनही झाले आहे. जालना हेदेखील एक औद्योगिक शहर असून, येथून मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होते. तसेच मेट्रो जालन्यापर्यंत झाल्यास त्याचा मोठा लाभ प्रवाशांना होऊन इंधनाची मोठी बचत होण्यासह कमी खर्चात औरंगाबादला जालन्याहून जाता येईल. त्या दृष्टीनेही विचार होणे गरजेच असल्याचे खोतकर म्हणाले.