सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला प्राधान्य देणार- उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:28 AM2019-10-11T00:28:57+5:302019-10-11T00:29:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शेतकरी कर्जमुक्त आणि चिंतामुक्त कसा होईल, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. पीकविमा मिळावा म्हणून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकरी कर्जमुक्त आणि चिंतामुक्त कसा होईल, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. पीकविमा मिळावा म्हणून मोर्चे काढले. त्यामुळे एक हजार कोटी रूपये विमा कंपन्यांना देण्या भाग पाडले. दरम्यान १५ वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना वेगवेगळ््या योजनांमध्ये गैरव्यवहार करून ते आता थकले असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी घनसावंगी येथील प्रचार सभेत बोलताना केली.
घनसावंगी येथील शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी ठाकरे गुरूवारी घनसावंगी दौ-यावर आले होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, जे आम्ही बोलतो ते करून दाखवितो. केवळ भूलथापा मारणे हा आमचा बाणा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केले होते त्या पावलावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. समाजातील वंचित घटकांना त्यांच्या विकास आणि हकांपासून दूर कोणी ठेवले, हे सर्वांना माहीत आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना १० रूपयांत पोटभर जेवण आणि १ रूपयामध्ये आरोग्य तपासणी करणार आहोत.
धनगर समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी एकत्रित लढा उभारला आहे. त्याला आमची भक्कम साथ असून, धनगरांनी त्यांच्या काठीला तलवारीची धार आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली. शिवसैनिकां समोर गुडघेच काय; परंतु डोकेही आपण टेकवू, असे सांगताना ठाकरे हे भावनिक झाले होते. यावेळी माजी आ. विलास खरात यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान या मतदारसंघात आजही अनेक प्रश्न कायम असल्याचे सांगण्यात आले. मतदार आता जागृत झाला असून, त्यांना भूलथापा देऊन वळवण्याचे जे प्रकार पूर्वी होत होते, ते आता होणार नाहीत, असेही खरात यांनी यावेळी नमूद केले.