दुकान मोडले तर उधारी बुडेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:57 AM2018-09-11T00:57:37+5:302018-09-11T00:57:58+5:30
जालन्यात निधीची गंगा खेचून आणली असून, या निधीतून जालन्याचा चौफेर विकास करताना सिडकोसाठी ५०० एकर, ड्रायपोर्टसाठी ५०० एकर आणि कौशल्य विकास तसेच सीडस् पार्कसाठी ९० एकर जमीन देऊ केली आहे. हे सर्व प्रकल्प उधारीवर नसून ते प्रत्यक्षात सुरू आहेत. परंतु ग्रामीण भागात एक म्हण आहे, दुकान मोडली तर उधारी बुडाली, असे सांगून सोमवारी जेईएस महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे हंशा पिकविला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या जालन्यात निधीची गंगा खेचून आणली असून, या निधीतून जालन्याचा चौफेर विकास करताना सिडकोसाठी ५०० एकर, ड्रायपोर्टसाठी ५०० एकर आणि कौशल्य विकास तसेच सीडस् पार्कसाठी ९० एकर जमीन देऊ केली आहे.
हे सर्व प्रकल्प उधारीवर नसून ते प्रत्यक्षात सुरू आहेत. परंतु ग्रामीण भागात एक म्हण आहे, दुकान मोडली तर उधारी बुडाली, असे सांगून सोमवारी जेईएस महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे हंशा पिकविला. ही दुकान मोडली म्हणजेच जर तुम्ही आगामी निवडणुकीत मला निवडून न दिल्यास हे प्रकल्प लांबणीवर पडतील म्हणजेच उधारी बुडेल, अशी त्यांनी त्यांच्या खास शैलीत इशारावजा धमकी दिली. सध्या महाविद्यालयात कधी विद्यार्थी असतात तर प्राध्यापक शिकवत नाहीत, आणि प्राध्यापक शिकवितात तर विद्यार्थी नसतात ही वास्तव परिस्थितीही दानवेंनी थेट केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समोर मांडून मोठी हिंमत केली. हे धोरण बदला परंतु ते २०१९ नंतर असा टोलाही लगावला.
यावेळी हळूहळू खुलत गेलेल्या भाषणात त्यांनी आपण याच महाविद्यालयामुळे यशस्वी झाल्याचे सांगून ऐन दुष्काळात या महाविद्यालयाने पांजरपोळमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करून शिक्षण न सोडण्यासाठीचे प्रयत्न हे निश्चितच प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. आपण तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर याच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत. तत्पूर्वी अर्जुन खोतकर यांनी आपल्या भाषणात या महाविद्यालयाशी आपले नाते हे विद्यार्थी म्हणून कसे घट्ट आहे, सांगतानाच आपले लग्न देखील येथे झाल्याचे सांगून, अनेक आठवणींतील किस्से सांगण्याची इच्छा आहे, परंतु ती ही वेळ नसल्याचे सांगून संयम राखला. मात्र यावेळी दानवे यांनी खोतकरांना चिमटा काढताना खोतकरांचा ‘चिठ्ठा’च आपल्याकडे आहे, मात्र तो काढण्याची ही वेळ नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. या वेळी या महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षात ५० लाख रूपये मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, मात्र, मला हे अधिकार नाहीत. बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकरांना ते आहेत, त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगून ते सध्या घोड्यावर अर्थात पदावर असल्याचा खुलासा करून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तिघेजण जाऊन हा निधी मिळवून देऊ, असे सांगतानाच इन्शाल्ला हा खास शब्दप्रयोग केला. तसेच उूर्द महाविद्यालय नसल्याची खंत बोलून दाखविल्याने सोशल इंजिनिअरींगचे प्रयोग आगामी काळात दिसणार हे निश्चत आहे. त्यातच जिल्ह्यात केवळ १३ महाविद्यालयेच अनुदानित असल्याचे त्यांनी सांगितले.