...तर बँकेतील पैसे राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 06:57 PM2019-09-13T18:57:10+5:302019-09-13T18:57:44+5:30
सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा
जालना - सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला. सरकारने बँकेतील एक लाखावरील डिपॉझिटची हमी नाकारली आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा, अशी बोचरी टिका, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकावर केली. बेराजगारी, मंदी, आरक्षणासह इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी चळवळीतून आलेल्या लोकांच्या हती सत्ता हावी आणि म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उभा केल्याचे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
जालना शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित बलुतेदार- अलुतेदार सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. यावेळी आंबेडकर यांनी केंद्र, राज्य सरकारवर टिकेची झोड उठविली. सरकारने औद्योगिकीकरण करताना बलुतेदार-आलुतेदारांचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आज अनेकांचे व्यवसाय मोडीत निघाले असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. संशोधकांनी स्वत:च्या नावाऐवजी बलुतेदार- आलुतेदारांच्या कलेचा विकास व्हावा, यासाठी संशोधन करावे. तसे झाले प्रत्येकाच्या हाताला काम मिळून बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशात टाटा, अंबानी हे नवे सावकार झाले असून, सत्तेत कोणाला बसवायचे हे ते निर्णय घेत आहेत. ही परिस्थिती केवळ बलुतेदार, अलुतेदार, कारागिरांची सत्ता बदलू शकते.
कलम ३०७ चा गवगवा करणा-या शासनाने हा निर्णय घेत पाकव्याप्त काश्मिर पाकिस्तानला दान केल्याचा आरोप करीत पाकव्याप्त काश्मिर मिळविण्याचे माध्यम सरकारने कापून टाकल्याचे ते म्हणाले. आपण सत्तेत आल्यानंतर जातीची जनजणना करणे, सरकारी बढतीत आरक्षण लागू करणे, केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत देणे आदी विविध योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव गोविंद दळवे, भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांच्यासह विविध बारा बलुतेदार, आलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.
‘त्या’ टाळीची किंमत कापूस उत्पादक भरणार
भाजपावाले आपला टीआरपी वाढविण्यासाठी मोदींनी ट्रम्प यांना टाळी दिल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. मात्र, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षानंतर अमेरिकेतील कापूस भारतात विकण्यासाठी ती टाळी होती. ४ हजार रूपये क्विंटलने अमेरिकेचा जिनिंगचा कापूस भारतात आला आहे. त्यामुळे शासनाने कापसाला साडेपाच हजार रूपये क्विंटल दर दिला असला तरी व्यापारी कमी किंमतीत कापूस खरेदी करणार असून, ट्रम्प यांच्या ‘त्या’ टाळीची किंमत देशातील कापूस उत्पादकांना भरावी लागणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.
पाणी वाटपाची मांडणी लवकरच
महाराष्ट्रात पाणी कमी नाही. मात्र, पाणी वाटपाचे योग्य नियोजन झालेले नाही. मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. ओल्या भागातील पाणी मराठवाड्यात वळविणे गरजेचे आहे. तसे झाले तर दुष्काळ कायमचा मार्गी लागणार असून, पाणी वाटपाची मांडणी आपण लवकरच करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.
तर जलील यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी
बाळासाहेब आंबेडकर यांनी डोक्यावर हात ठेवल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. जागा आपल्यामुळेच आली असे वाटत असेल तर इम्तियाज जलील यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान वंचित बहुजन आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी यावेळी दिले. गणेश विसर्जनानंतर आता केंद्र, राज्य सरकारला विसर्जित करण्याची वेळ आली असून, समाजातील सर्व घटकांनी वंचितच्या पाठीशी रहावे, असे आवाहन त्यांनी केले.