जालन्यातील बड्या रुग्णालयांचे आरोग्य विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:52 PM2018-05-26T13:52:16+5:302018-05-26T13:52:16+5:30
शहरी भागातील बहुतांश बड्या रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले जाते नसल्याचा प्रकार तपासणीत समोर आला आहे.
जालना : शहरी भागातील बहुतांश बड्या रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले जाते नसल्याचा प्रकार तपासणीत समोर आला आहे. अशा रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ४८ तासात खुलासा सादर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शहरात लहान-मोठी २०० हून अधिक रुग्णालये आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून जालना शहरासह तालुका पातळीवरील सर्वच खजगी रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील तीन आठवड्यांपासून १२ पथकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या तपासणीमध्ये रुग्णालयात प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसणे, परवानगी नसताना अधिक रुग्णांना भरती करणे, कुठलीही पूर्वनोंदणी न करताना रुग्णालय थाटून उपचार करणे, बायो मेडिकल वेस्टजची योग्य विल्हेवाट न लावणे, अधिकची फी आकारणे, उपचारानंतर पक्के बिल न देणे, रुग्णालय संलग्न मेडिकल दुकानांना परवाना नसणे, रुग्णालयात सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना नसणे आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. शहरातील काही मोठ्या रुग्णालयांचाही यात समावेश आहे. विशेषत: भोकरदन तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.
बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्रुटी आढळून आलेल्या सुमारे २२ हून अधिक रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णालयांनी ४८ तासात समाधानकारक स्पष्टीकरण देवून त्रुटी दूर न केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.
सोनोग्रॉफी सेंटरचीही तपासणी
पीसीपीएनडीटी कायद्याच्या काटेकोर अमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सोनोग्रॉफी सेंटरचीही नियमित तपासणी करण्यात येत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. प्रत्येक तीन महिन्याला सोनोग्रॉफीशी संबंधी आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याने बहुतांश सेंटरमध्ये नियमांचे पालन केले जात असल्याचे तपासणीत समोर आल्याचे ते डॉ. राठोड म्हणाले.