अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:03 PM2024-05-20T20:03:24+5:302024-05-20T20:03:48+5:30

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये सहभाग घेत अनेकांनी पैसा कमावून आलिशान बंगले बांधल्याची चर्चा पथकाने कारवाई केल्यानंतर भोकरदन शहरात चांगलीच रंगली होती.

Illegal pregnancy test racket threads in Bhokardan; As soon as the team arrived, some doctors disappeared from the city | अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब

अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब

भोकरदन (जि. जालना) : छत्रपती संभाजीनगर येथील अवैध गर्भलिंगनिदान, गर्भपाताचे धागेदोरे आता भोकरदन शहरापर्यंत पाेहोचले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील एक पथक रविवारी भोकरदन शहरात दाखल होताच काही संशयित डॉक्टरांनी शहरातून धूम ठोकली. या पथकाने एका मेडिकल चालकाला ताब्यात घेतले असून, एका डॉक्टरला नोटीस दिल्याचे समजते.

पोलिसांचे एक पथक रविवारी भोकरदन शहरात आले होते. भोकरदन, वाडी (बु.), पेरजापूर, हसनाबाद परिसरात एजंटांचे जाळे पसरल्याचा पोलिसांना संशय आहे. या पथकाने रविवारी भोकरदन शहरातील एका हॉस्पिटलची तपासणी केली. पोलिस निरीक्षक राजेश यादव यांच्यासह पाच कर्मचारी, भोकरदन पोलिस ठाण्यातील एक महिला पोलिस कर्मचारी, एक पुरुष कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व छत्रपती संभाजीनगर येथील दोन डॉक्टरांच्या पथकाने पंचनामा केला. तेथे संबंधित डॉक्टर आढळला नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीला नोटीस बजावण्यात आली. हे पथक वाडी येथे गेले असता संबंधित विनाडिग्री असलेला डॉक्टर फरार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरचे पोलिस भोकरदन तालुक्यात ठाण मांडून होते. त्यांनी एका मेडिकल चालकाला ताब्यात घेतले असून, काही पॅथाॅलाॅजी चालकसुद्धा या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. छत्रपती संभाजीनगरचे पथक भोकरदन शहरात येऊन कारवाई करीत असताना तालुका, जिल्हा आरोग्य विभागाला याची माहिती कशी काय मिळाली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

अनेकांनी कमावला पैसा
अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये सहभाग घेत अनेकांनी पैसा कमावून आलिशान बंगले बांधल्याची चर्चा पथकाने कारवाई केल्यानंतर भोकरदन शहरात चांगलीच रंगली होती. हे पथक रात्री उशिरापर्यंत हसनाबाद परिसरात होते. त्यामुळे भोकरदन शहरातील आणि तालुक्यातील कोणकोणते एजंट, डॉक्टर, मेडिलक चालक पथकाच्या गळाला लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Illegal pregnancy test racket threads in Bhokardan; As soon as the team arrived, some doctors disappeared from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.