कोठाळा येथील वाळूघाटातून अवैध वाळूचा उपसा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:52 AM2019-05-07T00:52:15+5:302019-05-07T00:52:50+5:30
कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.
रवी गात ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : तालुक्यातील कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे.
विशेष म्हणजे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने कोणत्याही वाळू घाटातून पर्यावरण विभागाने निर्देशित केलेल्या अर्धा मीटर म्हणजेच साधारण पावणे दोन फूट खोलीपेक्षा जास्त वाळू उत्खनन करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २७ फेबु्रवारी २०१२ रोजी दिला होता. या आदेशाला ठेंगा दाखवत या वाळूगटातून दोन अजस्त्र पोकलेनच्या सहाय्याने दहा-दहा फूट खड्डे खोदून बेसुमार वाळू उपसा करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील कोठाळा येथील वाळू गटाचा लिलाव करण्यात आला. ३ हजार ७४ ब्रास वाळू उपसा करावा असे लिलावात म्हटले होते. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त वाळूचा उपसा करण्यात आल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिकेमध्ये दिनांक २७ फेबु्रवारी २०१२ रोजी दिलेल्या आदेशानुसार नदीपात्रातील पाणी शुध्द व स्वच्छ राहण्यासाठी तसेच पाण्याचे नैसर्गिकरीत्या नदीपात्रात वहन होण्यासाठी वाळू गटातून पर्यावरण विभागाच्या अनुमतीनुसार परवानगी दिलेल्या खोलीपर्यंतच लिलावधारकास वाळू उत्खनन करता येईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, विशेष म्हणजे ही खोली कोणत्याही परिस्थितीत ३ मीटरपेक्षा जास्त असणार नाही हे नमूद करण्यात आले आहे. मात्र, कोठाळा येथील वाळू गटाची पाहणी केली असता लिलावधारकाने निविदेमध्ये नमूद करण्यात आलेल्या बहुतांश अटींचे उल्लंघन केलेले आढळून येते.