शहागड येथे टॅक्टरवर बाईकचा क्रमांक टाकून अवैध वाळू वाहतुकीसाठी वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 12:36 PM2017-11-20T12:36:45+5:302017-11-20T12:39:01+5:30
अवैध वाळू वाहतूक करणा-या टॅक्टरवरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शहनिशा करण्यासाठी टॅक्टरवरील नंबरची मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता हा क्रमांक बाईकचा असल्याचे उघडकीस आले.
जालना : शहागडसह परिसरात अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल विभागाने दंड थोपाटल्याचे पथकाने केलेल्या कारवाईत दिसून येत आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणा-या टॅक्टरवरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शहनिशा करण्यासाठी टॅक्टरवरील नंबरची मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता हा क्रमांक बाईकचा असल्याचे उघडकीस आले.
आपेगाव, गोंदी, कोठाळा (ता.अंबड ) या भागातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूच्या पथकाने दंड थोपटून कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येते आहे. या आठ दिवसांत तहसीलदार दत्ता भारस्कर, मंडळ अधिकारी कृष्णा एडके व महसूलच्या पथकाने पाच-सहा अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावले आहेत.विशेष म्हणजे हे सर्व टॅक्टर नवीन आहेत. काहींच्या ट्राल्या नवीन आहेत. टॅक्टर वर नंबर प्लेट नाही. एखाद्यावर नंबर प्लेट आहे तर त्या समजू नये अशा करून ठेवल्या आहेत.
तहसिलदारांनी केली मध्यरात्री कारवाई
तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी रविवारी मध्यरात्री दिड वाजता गोरी-गंधारी शिवारात अवैध वाळू तस्करीवर कारवाई केली. यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणारा टॅक्टर (क्र. एमएच. 21. एझेड. 3764) पकडून पुढील कार्यवाहीसाठी शहागड पोलीस चौकीत आणला. पुढील कारवाईसाठी चालक मालकाचा शोध घेतेवेळी टॅक्टरवरील नंबर संशयास्पद वाटल्याने. तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सहनिशा करण्यासाठी टॅक्टर वरील नंबर मोबाईल अॅपवर पडताळून पाहिला असता तो नंबर दुचाकीचा असल्याचे आढळून आला.
आरटीओ विभागाचे सपशेल दुर्लक्ष
या प्रकाराकडे आरटीओ विभागाचे सपशेल दुर्लक्ष केले आहे. कित्येक वर्षापासून शहागडसह परिसरात एकही टॅक्टर वर कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या शहागड पोलीस चौकीत पाच अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावण्यात आलेले आहेत. यातील सर्व टॅक्टरचे क्रमांक संशयास्पद आहेत. यामुळे आता शहागडसह परिसरातील विना नंबर व विना पासिंगचे फिरणा-या टॅक्टरवर आरटीओ कोणती कारवाई करते का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आरटीओ कार्यालयाला कळवले आहे
अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावले आहे, त्याचा नंबर संशयास्पद वाटल्यास मोबाईल अॅपवर डाऊनलोड केला असता तो टॅक्टर वरचा नंबर मोटारसायकलचा असल्याचे आढळून आले आहे. आपण याबाबत आरटीओ ऑफिस जालना ला पत्राद्वारे कळवणार असल्याचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.