अवैध वाळू वाहतूक; पाच जणांविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:16 AM2019-11-12T00:16:59+5:302019-11-12T00:17:24+5:30
वैध वाळू वाहतूक प्रकरणात पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कारवाई डोंगरगाव- देवपिंपळगाव शिवारात रविवारी सायंकाळी तर दुसरी कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव झोपडपट्टी मार्गावर करण्यात आली.
बदनापूर : अवैध वाळू वाहतूक प्रकरणात पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कारवाई डोंगरगाव- देवपिंपळगाव शिवारात रविवारी सायंकाळी तर दुसरी कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव झोपडपट्टी मार्गावर करण्यात आली.
डोंगरगाव- देवपिंपळगाव दरम्यान केलेल्या कारवाईत एका वाहनासह पाच ब्रास वाळू असा ३० लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात सपोनि शाहुराज भिमाळे यांच्या तक्रारीवरून राजू धळाजी वनारसे (रा. विटा ता.भोकरदन), कृष्णा शालिकाराम घनघाव, कृष्णा प्रकाशराव घनघाव (दोघे रा.डोंगरगाव ता. बदनापूर) या दोघाविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ डोईफोडे हे करीत आहेत.
सोमवारी रांजणगाव झोपडपट्टी भागात एका वाहनावर कारवाई करण्यात आली. यावेळी वाहनासह एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकॉ धनसिंग गब्बरसिंग जारवाल यांच्या तक्रारीवरून शेख इसाक शेख मुसा (रा. रांजणगाव ता. बदनापूर), सर्जेराव खांडेकर (रा.काजळा, ता. बदनापूर) या दोघाविरूध्द बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ डोईफोडे हे करीत आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरूध्द पोलीस व महसूल पथकाने सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.