अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:14 AM2019-07-25T01:14:48+5:302019-07-25T01:15:39+5:30
घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर महसूल आणि पोलीस पथकाने कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर महसूल आणि पोलीस पथकाने कारवाई केली. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेवराई तालुक्यातील गंगावाडी (जि. बीड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू लिलावधारक युवराज जगताप (रा. सावरगाव ता.माजलगाव) यांनी त्यांची हद्द सोडून घनसावंगी तालुक्यातील भोगगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून बुधवारी सकाळी वाळूचा उपसा सुरू केला होता. ही माहिती मिळताच घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, गोंदीचे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व पथकाने घटनास्थळी कारवाई केली.
या कारवाई दरम्यान बीडचे अधिकारी, कर्मचारी देखील हजर असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाहने गोंदी ठाण्यात जमा केली आहेत.