संशय येऊ नये म्हणून गोणीत गावठी बंदुका घेऊन दोघे चालत निघाले, तरीही अडकले
By दिपक ढोले | Published: May 5, 2023 06:18 PM2023-05-05T18:18:34+5:302023-05-05T18:21:50+5:30
अकोला देव पाटीजवळ देऊळगावराजाकडे जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले
जालना : पांढऱ्या रंगाच्या गोणीत दोन गावठी बंदुका घेऊन जाणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. ही कारवाई टेंभूर्णी ते देऊळगावराजा रोडवरील अकोलादेव पाटीजवळ करण्यात आली. हिरासिंग मोहनसिंग बावरी (वय १९, रा. चिखली रोड, देऊळगावराजा), रोशनसिंग बबलूसिंग टाक (१८, रा. संजयनगर, बायपास, देऊळगावराजा) अशी संशयितांची नावे आहेत.
अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन शोध घेत असताना, अकोला देव पाटीजवळ दोघेजण देऊळगावराजाकडे गोणीत गावठी बंदुका घेऊन पायी जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, सहाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना थांबविले. त्यांची नावे विचारून, त्यांच्या जवळील गोणीची तपासणी केली असता, त्यात दोन गावठी बंदुका आढळून आल्या.
या प्रकरणी गोकुळसिंग कायटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुध्द टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, अंमलदार गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, योगेश सहाने यांनी केली.