"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:19 PM2024-08-29T12:19:37+5:302024-08-29T12:20:41+5:30

मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे.: मनोज जरांगे

"I'm not a casteist, I'm a reservationist"; Anniversary of Maratha reservation movement, Manoj Jarang's message to society | "मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :
 ''श्रीमंत मराठापासून ते गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाकडे अख्ख जग पाहतेय. मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वायाला जाऊ देणार नाही. सर्व असेच एक रहा'', असा संदेश मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी समाजाला दिला. वर्षभरात काय मिळाले, काही बाकी आहे याबाबत चिंतन करण्यासाठी आज फक्त छोटी बैठक आहे. कोणीही काम बुडवून इकडे येऊ नका, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. तसेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर पुढील भूमिका मांडू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. ते आज सकाळी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षापूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर जरांगे म्हणाले, यापूर्वी मराठा समाज एकत्र होत नाही असं बोललं जायचं. यामुळे माझ्या समाजाकडे तिरस्काराने बघितले जायचे. पण मागील वर्षीची २९ तारीख अशी उजडली, समाजाने डरकाळी फोडली.  त्याचा संबंध महाराष्ट्रभर आवाज गेला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मराठा समाज एकत्र आला होता. आज वर्षपूर्ती असून यापुढे कितीही मोठे संकट आले तरी एकत्र रहा. कुटुंब एक असेल तर कोणी ते तोडू शकत नाही, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे यांनी मागील वर्षी २९ ऑगस्ट रोजी पैठण फाटा, शहागड येथे जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. त्याठिकाणी जाऊन जरांगे यांनी मराठा समाज एकत्र झालाय त्याची येथून सुरूवात झाली, असे म्हणत आठवणींना उजाळा दिला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटीतून आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली होती.त्यांच्या घटनेस आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त आज अंतरवाली सराटीमध्ये छोटीखानी बैठकीच आयोजन करण्यात आला आहे. यावेळी एका वर्षात समाजाने काय मिळवलं, काय मिळवायचे आहे  यावर चर्चा होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

राज्यातील मराठा समाज एकत्रित येणे गरजेचे. पावणे दोन कोटी मराठी आज ओबीसी आरक्षणात गेले. माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे, एखादी गोष्ट लगेच नाही मिळाली तर चार दिवस उशिरा मिळेल. विजय तुमच्या पायात येऊन पडणार. मी लढायला खंबीर आहे. गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला . त्याला आपण जबाबदार आहोत, असेही म्हणत जरांगे यांनी समाजाचे कान टोचले.

Web Title: "I'm not a casteist, I'm a reservationist"; Anniversary of Maratha reservation movement, Manoj Jarang's message to society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.