'त्यांची काळजी वाटते अन् अभिमानही'; मनोज जरांगेच्या पत्नी सुमित्रा झाल्या भावूक, म्हणाल्या...
By विजय मुंडे | Published: September 4, 2023 07:44 PM2023-09-04T19:44:59+5:302023-09-04T19:45:54+5:30
आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.
- अशोक डोरले
अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण मागील सात दिवसांपासून सुरू आहे. शासनाने अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढतायत याचा अभिमान वाटतो. परंतु, आंदोलनाची वाढती तीव्रता आणि त्यांची खालावणारी तब्येत यामुळे काळजी वाटत असल्याची भावना मनोज जरांगे यांच्या पत्नी सुमित्रा जरांगे यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मागील सात दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. लाठीचार्ज, गोळीबार प्रकरणानंतर या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांच्या भावना 'लोकमत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनोज जरंगे यांच्या घरी आजोबा रावसाहेब जरांगे, आजी पर्वती जरंगे, पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज, मुली वैष्णवी, प्रणाली, पल्लवी हे होते. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर मनोज जरांगे व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलांचे शिक्षण सुरू असून, शिवराज जालन्याला अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला आहे. वैष्णवी बारावीला असून ती नीट परीक्षेची तयारी करते. प्रणाली नववीला असून, पल्लवी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचे हे कुटुंब साक्षीदार नव्हे त्यांना वेळोवेळी कुटुंबातील सदस्यांनी पाठींबा दिला. परंतु, यावेळचे आरक्षण अधिकच चर्चेत आले आहे. लाठीहल्ला, गोळीबार, दाखल होणारे गुन्हे यामुळे कुटुंबियांची चिंता वाढत आहे. शिवाय मनोज जरांगे यांच्या लढ्याचा अभिमान आहे. परंतु, त्यांची खालावणारी प्रकृती कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे शासनाने आरक्षणाचा प्रश्न सकारात्मक दृष्टीने मार्गी लावावा, अशी मागणीही हे कुटुंबिय करीत आहेत.
खूप अभिमान वाटतो
गावाकडच्या दोन एकर शेतीतून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. माझे पती मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. याचा मला अभिमान आहे. बेमुदत उपोषण काळात त्यांची तब्येत खालावत आहे. त्यामुळे चिंता वाटत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. याचा मराठा समाजातील गरिब कुटुंबातील मुलांना लाभ होईल.
- सुमित्रा जरांगे, पत्नीकोट
वडील भावनिक होतील, म्हणून जात नाही
माझे वडिल आरक्षणाची लढाई लढत आहेत. अंतरवाली सराटी येथे आंदोलनात जावून त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. परंतु, वडील भावनिक होतील म्हणून जाता येत नाही. त्यांच्या आरोग्याची खूप काळजी वाटते. शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले तर गरजू कुटुंबातील मुलांना त्याचा लाभ होईल. शासनाने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.
- शिवराज जरांगे, मुलगा