ट्रकच्या धडकेने प्राचीन मूर्तीवेशीची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:45+5:302021-08-01T04:27:45+5:30
निजाम सरकारचे वर्चस्व असल्याने येथे जहागीर होती. असे जुने जाणकार सांगतात. शहरात एकूण आठ ते दहा प्रमुख वेशी होत्या. ...
निजाम सरकारचे वर्चस्व असल्याने येथे जहागीर होती. असे जुने जाणकार सांगतात. शहरात एकूण आठ ते दहा प्रमुख वेशी होत्या. परंतु, त्या काळाच्या ओघात नामशेष झाल्या आहेत. यातील पहिली वेस ही जुना जालना भागातील कचेरीरोड येथून शहरात प्रवेश करताना असलेली मुक्तेश्वर वेस होय, आज या वेशीवरील घुमट आणि दरवाजे अस्तित्वात नाहीत. परंतु त्याच्या खुणा येथे कायम आहेत. दुसरी वेस ही अंबडवेस म्हणून ओळखली जात होती. ती देखील आज अस्तित्वात नाही. आज घडीला कादराबाद भागातील पाणीवेस चांगल्या स्थितीत असून, मूर्तीवेस ही देखील बऱ्यापैकी मजबूत होती. परंतु, शुक्रवारी एका ट्रकने धडक दिल्याने त्या वेशीचा वरील भाग कोसळला आहे, तसेच बांधकामालाही तडे गेले आहेत.
यापाठोपाठ दर्गावेस ही देखील चांगल्या स्थितीत आहेे. एकूणच या चांगल्या अवस्थेत आहेत. दरम्यान, मूर्तीवेस तसेच दर्गावेस आणि पाणीवस ही अवखाफ बोर्डाच्या अखत्यारीखाली येतात. त्यामुळे बोर्डाने जालना पालिकेला पत्र दिल्यास त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करता येऊ शकते, अशी माहिती पालिकेचे अभियंता सैय्यद सौद यांनी सांगितली.
चौकट
पालिकेने केला रस्ता बंद
पाणीवेशीतून शिवाजी पुतळा परिसरात जाण्यासाठी पाणीवेस आणि त्याच्यापुढे मूर्तीवेस होती. परंतु, शुक्रवारी रात्री एका ट्रकने या वेशीला जोरदार धडक दिल्याने या वेशीचा काही भाग निखळल्याने या वेशीतून होणारी वाहतूक पालिकेने टीनपत्रे ठोकून बंद केली आहे. तसेच पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर तसेच अभियंता सैय्यद शेख यांनी या भागात भेट देऊन लहान मुलांनाही या भागात जाऊ न देण्याचे आवाहन केले.
औरंगाबाद पॅटर्नची गरज
ज्याप्रमाणे औरंगाबाद शहरातील भडकल गेट, पैठण गेट या जुन्या वेशींचे ज्या पद्धतीने संरक्षण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर जालन्यातील वेशींचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हा निजामकालीन ठेवा जपल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासह ऐतिहासिक ठेवाही जतन होऊ शकतो, अशी नागरिकांची मागणी आहे.