‘जुई, धामणा’तील गाळ काढण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:56 AM2018-11-22T00:56:01+5:302018-11-22T00:56:21+5:30
करदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन तालुक्यात कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई व धामणा धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरिंचंद्र गवळी यांनी जुई धरणातील गाळाची पाहणी केली़
यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील जुई आणि धामणा धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यां पासून ही धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे भोकरदन शहरासह किमान ३० गावांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. मात्र भविष्यामध्ये या धरणातील पाणी साठवण क्षमता वाढावी, यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या असून, मंगळवारी उपविभागीय अधिकारी व इतर अधिका-यांनी धरणांची पाहणी केली. शासनाने धरणातून गाळ काढून दिल्यावर शेतक-यांनी तो आपल्या शेतात घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गवळी यांनी संगितले.
उपविभागीय अधिकारी गवळी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणातील गाळाची माहिती मागविली असून, आपण तात्काळ जुई व धामणा धरणातील गाळाची माहिती देणार आहोत. शेतक-यांनी हा गाळ घेऊन जाण्यासाठी जनजागृती करणार असून, प्रत्येक गावात दवंडी देऊन व बैठका घेऊन शेतक-यांना गाळ घेऊन जाण्याचे आवाहन करू असे ते म्हणाले.
तालुक्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर
तालुक्यात सध्या कठीण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप तालुक्यात दुष्काळी कामे सुरू करण्यात आलेले नाही. शिवाय पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुरांच्या चा-यासह पिण्यासाठी पाणी नाही. शासनाने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे असे असले तरी गुरांसाठी अद्याप कोठेही चारा छावणी सुरू केलेली नाही. गुरांना पिण्यासाठी पाणी नाही. शिवाय चारा छावणी सुरू करावयाची असल्यास पद्मावती व बाणेगाव येथील मध्यम प्रकल्पाजवळच चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. दुसरीकडे तालुक्यात कोठेही पाणी साठा नाही अशी परिस्थिती पाऊस कमी पडल्याने निर्माण झाली आहे.