कोरोना काळात सकस आहाराला दिले गेले महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:15+5:302021-06-16T04:40:15+5:30
जालना : कोरोनाने ज्या प्रमाणात जीवनशैली बदलली आहे. त्याच प्रमाणात आहार-विहार बदलला आहे. सकस आणि ताजे अन्न खाण्याकडे नागरिकांचा ...
जालना : कोरोनाने ज्या प्रमाणात जीवनशैली बदलली आहे. त्याच प्रमाणात आहार-विहार बदलला आहे. सकस आणि ताजे अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
कोरोनामुळे सर्वांत जास्त फटका हा फुप्फुसांना बसतो. त्यामुळे फुप्फुसांचे व्यायाम आणि कमी तळलेले पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे. लॉकडाऊनमुळे घरातील जवळपास सर्वच जण हे घरीच राहत त्यामुळे नियमित हाेणारा व्यायाम आणि कामानिमित्त ये-जा करतानाची दग दग होत नव्हती. यावर उपाय म्हणून हलके अन्न म्हणजेच भात, खिचडी, यासह उपीट, ज्वारी, बाजरीची भाकरी खाण्याकडे कल वाढला होता. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या जीवनसत्वाचे पालभाज्यांनाही मोठे महत्त्व आले होते.
कच्च्या भाज्या, कडधान्ये...
कोरोनात प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून, मेथी, पालक, तसेच मुळात काकडी, कांदा या कच्चा भाज्यांना प्राधान्य दिले जात होते. भाज्यांप्रमाणेच मटकी, चवळी आदी कडधान्यांना मागणी होती.
कडधान्य आणि भाज्या यांच्या मिश्रनालाही घरोघरी प्राधान्य दिले जात होते. यामुळे मध्यंतरी चवळी, मटकी तसेच हरभरे आणि अन्य मोड येणाऱ्या धान्यांची मागणी वाढली होती.
या कडधान्य आणि भाज्यांच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढ होतच होती. परंतु, ज्यांना कोलेस्ट्रॉल यासह ॲसिडीटीचे आजार कमी होण्यासही यामुळे मदत झाली.
फास्ट फूडवर अघोषित बंदी
कोरोना काळात बाहेरील जवळपास सर्वच हॉटेल आणि फूडपार्क बंद होते. त्यामुळे इच्छा असूनही कोरोना काळात फास्टफूड बाहेरून मागविता येत नव्हते. तसेच घरोघरी हे फास्टफूड तयार करण्यासाठी लागणारी कसब नसल्यानेदेखील फास्टफूडवर एकप्रकारे बंदी आली होती.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या जेवनामध्ये दूध, फळे आणि मांसाहाराला महत्व दिले जात होते.
तर काही ठिकाणी ड्रायफ्रुटसमध्ये काजू, बदाम, अंजीर, मनुका, पिस्ते, सेवनावर भर दिला गेला.
साजूक तूप, दही, ताक, या पदार्थांनाही उन्हाळा असल्याने मोठी मागणी होती.
गृहिणी म्हणतात....
फार पूर्वीपासून स्वयपांकघरातील विविध पदार्थ म्हणजे एक प्रकारचे औषधीच होत. त्यात प्रामुख्याने हळद, हिंग, काळा मसाला यांचा समावेश करता येईल. दररोजच्या चमचमीत पदार्थासाठी या वस्तुचा वापर केला जातो. त्यातून आरोग्य चांगले राहते.
- दक्षा लोदवाल
कोरोना काळात नोकरी, व्यवसाय करणारे पुरुष हे सातत्याने घरीच होते. त्यामुळे मोठ्या माणसांप्रमाणेच लहान्याकडूनही वेगवेगळ्या पदार्थाची मागणी होत असे. हे तयार करताना बाहेरचे कुठलेच साहित्य वापरले जात नव्हते. त्यामुळे सर्वांना ते आवडायचे
- सुनीता कुटे
कोरोनाने सर्व कुटुंबाना एकत्रित भोजन करण्याची सवय लावली. यातून वेगवेगळे सकस पदार्थ हे आवडत नसले तरी एकमेकांना आग्रह करून ते दिले जात होते. त्यामुळे आपोआपच प्रतिकारशक्ती वाढण्यासह मानसिक दृष्ट्याही चांगले संतुलन जुळले.
- विशाखा नाईक