जैवविविधतेतील महत्वाचा दुवा; जालन्यात आढळली दुर्मीळ ‘जिको रॉक डेक्कनसीस’ पाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:38 PM2022-06-16T18:38:14+5:302022-06-16T18:38:54+5:30
अन्न साखळीचा हा महत्त्वाचा घटक असून, या पालीचा नैसर्गिक अधिवास हा झाडांवर आहे.
आव्हाना (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे ‘‘जिको रॉक डेक्कनसीस’’ ही दुर्मीळ पाल आढळली आहे. जैवविविधतेचे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी या पालीच्या दुर्मीळ प्रजातीची नोंद केली आहे.
आव्हाना गावातील शेतकरी डॉ. श्रीकांत गावंडे यांच्या शेतात ही पाल आढळून आली. झूलॉजिकल सर्व्ह ऑफ इंडियाने या पालीची नोंद घेतली असून, ग्रामपंचायतीच्या जैवविविधता रजिस्टरमध्ये या पालीची नोंद ग्रामसेवकांनी घेतली आहे. जालना-औरंगाबाद विभागात प्रथमच अशा दुर्मीळ पालीची नोंद झाली आहे. या पालीची लांबी ५ इंच असून, नव्याने आलेली २ इंच लांबीची फिकट गुलाबी शेपटी आहे. पाठीवर खवले व फिकट गुलाबी रंग व त्यावर २ समांतर पांढऱ्या रेषांचे पट्टे आहेत. आडव्या पट्ट्यांवर अधून मधून हिरवे ठिपके; तर मानेवरची त्वचा तपकिरी रंगाची आहे.
अन्न साखळीचा हा महत्त्वाचा घटक असून, नैसर्गिक अधिवास हा झाडांवर आहे. तसेच गवत, खडकाळ भाग आदी ठिकाणीही तिचा रहिवास असतो. पश्चिम घाट, कोकण, सह्याद्रीची पठारे विशेषतः दख्खन भागात ही पाल आढळत असल्याने तिच्या नावात ‘‘डेक्कन’’ शब्द येतो. अशी माहिती जैवविविधता अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी दिली आहे. या नोंदीचा अभ्यासकांना संदर्भ म्हणून उपयोग होईल. कीटक, लहान फळं व फुलं हे या पालीचे अन्न आहे. ही प्रजात अनेक सापांचे भक्ष्य आहे. देशात पालीच्या विविध प्रजातींच्या साडेतीनशेहून अधिक प्रजातींची नोंद आहे. यापूर्वी राज्यात रायगड जिल्ह्यातील फणसाड व सातारा येथे ही पाल आढळल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रक
सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल भीती व घृणा असल्याने नवीन प्रजाती दिसल्यास हानिकारक असावी, या गैरसमजुतीने तिच्या हत्या होतात. कीटकनाशके अशा सरीसृप कीटकांना मारक ठरत आहेत. वाढते तापमानही यास घातक ठरते. ही ‘जिको’ कीटकभक्षी असल्याने नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण करते. त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होतो.
- डॉ. संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड