सुधारित... शहीद जवानाला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी लोटला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:26+5:302020-12-24T04:27:26+5:30
भोकरदन : पुणे येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेला जवान गणेश संतोष गावंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी भिवपूर (ता.भोकरदन) येथे ...
भोकरदन : पुणे येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेला जवान गणेश संतोष गावंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी भिवपूर (ता.भोकरदन) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासन, प्रशासनाच्या वतीनेही त्यांना मानवंदना देण्यात आली. शहीद जवानाला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील गावांमधून जनसागर लोटला होता.
भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील रहिवासी असलेले गणेश गावंडे (३६) यांची काही दिवसांपूर्वी श्रीनगर येथून पुणे येथे बदली झाली होती. पुणे येथे सोमवारी सकाळी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव बुधवारी औरंगाबाद येथून भारतीय सैन्यदलाच्या वाहनातून मूळ गावी भिवपूर येथे आणण्यात आले. त्यांचे पार्थिव गावात येण्यापूर्वी गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करून त्यांच्या पार्थिव देहाच्या रथाचे दर्शन घेतले. अंत्ययात्रेच्या रथासमोर भक्तिगीते वाजवून अंत्ययात्रेचा मार्ग देखील सुशोभित करण्यात आला होता. गावाच्या बाजूला असलेल्या त्यांच्याच शेतीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नायब सुभेदार विजय हवालदार, हवालदार प्रकाश काळे, विलास नाईक, गिलानी शेख, माजी सैनिक संघटनेचे हवालदार विठ्ठल जगताप, हवालदार बाळू तायडे यांच्या वतीने सैनिकी रीतीरिवाजाप्रमाणे त्यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून देखील फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली. शहीद जवानाची आई कमलाबाई गावंडे, पत्नी पुष्पाबाई गावंडे, मुले कार्तिक गावंडे, यश गावंडे यांनी सलामी देताच सर्व उपस्थितांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी अंजली कानडे, पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे, सपोनि बी. बी. वडदे, नायब तहसीलदार के. टी. तांगडे, उपनिरीक्षक नागरगोजे आदींनी शासन, प्रशासनाच्या वतीने त्यांना मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, युवकांची उपस्थिती होती.
मुलांनी फोडला टाहो
शहीद जवानाचा मुलगा कार्तिक यांनी भडाग्नी दिला. त्यावेळी पप्पा कधी परत येणार असे म्हणत त्याने हंबरडा फोडला होता. त्याचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अंजली कानडे यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.
कॅप्शन : - भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथे फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित जनसागर. (फोटो २३जेएनपीएच०७)