जलयुक्तमुळे परिस्थितीत सुधार - राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:10 AM2018-09-18T01:10:26+5:302018-09-18T01:10:46+5:30
राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले. तालुक्यातील जवखेडा खूर्द येथे जलपूजन व मत्स्य बोटुकली शेततळ्यात सोडून पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पाची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी खा.रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, भास्कर दानवे, आशा पांडे, राजेंद्र देशमुख, तुकाराम जाधव, उपविभागीय अधिकारी हरिचंद्र गवळी, सुनील जयभाये, संतोष गोरड, शालिकराम म्हस्के, मधुकर दानवे, गणेश फुके, आर.के.जाधव, सुधाकर दानवे, गणेश ठाले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी आ.संतोष दानवे यांनी राज्यपालाचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
यावेळी खा.रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्दीष्ट शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे व यासाठी शेतीमध्ये भरीव गुंतवणूक करण्याची भाजपा सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे असे सांगितले, तर राज्यपाल म्हणाले की, दानवे यांच्या प्रयत्नातून मराठवाड्यातील शेतक-यांसाठी पुरक उद्योग म्हणून शेततळ्यात पिंजरा मत्स्यपालन हा नावीन्यपूर्ण प्रकल्प जवखेडा ता. भोकरदन, येथून सुरू होत आहे. तो राज्यासाठी पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन विद्यासागर राव यांनी केले. यावेळी आ.संतोष दानवे, आ.नारायण कुचे, डॉ.विवेक वर्तक आणि अशोक गायकर यांनी राज्यपालांना या संशोधनाची माहिती दिली त्यावर राज्यपालांनी हे संशोधन शेतक-यांनसाठी उपयुक्त ठरणारे असल्याचे सांगितले. असे प्रकल्प राज्यातील इतर भागातही राबविता येतील काय, याचा आभ्यास तज्ज्ञांनी करावा असा सल्लाही विद्यासागर राव यांनी दिला.