जालन्यातून बेपत्ता झालेली शाळकरी मुले शिर्डीत सापडली, म्हणतात करिअर करायला गेलो होतो
By विजय मुंडे | Published: August 17, 2023 07:30 PM2023-08-17T19:30:14+5:302023-08-17T19:31:11+5:30
लॅपटॉपचे चार्जर घेतले अन् सीसीटीव्हीत कैद झाले
जालना : १५ ऑगस्ट रोजी जालना शहरातून बेपत्ता झालेली तीन शाळकरी मुलं गुरुवारी (दि. १७) सकाळी शिर्डी येथे सापडली. लॅपटॉपचे चार्जर विकत घेण्यासाठी एका दुकानावर गेल्यानंतर ती मुलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. व्यावसायिकाने शिर्डीतील ‘लोकमत’ वार्ताहर आणि पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सकाळी नातेवाइकांसमवेत शिर्डीत जाऊन मुलं झोपेतून उठण्यापूर्वीच रूम गाठून त्यांना ताब्यात घेतले.
अंकित प्रकाश जाधव (१५, रा. सिंचन वसाहत, इदगाह मैदानाच्या मागे, जुना जालना), स्वराज संतोष मापारी (१४, रा. घायाळनगर, जुना जालना) व हर्षद अशोक देवकर (१४, रा. कसबा, गांधीचमन, जुना जालना) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांची नावे आहेत. ट्युशनला जातो असे सांगत जालना शहरातील तिन्ही मुलं मंगळवारी (दि. १५) सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडली होती. या प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी रात्री ती मुलं शिर्डी येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, राऊत, नंदू जावळे यांनी नातेवाइकांसमवेत शिर्डी गाठली. शिर्डी येथे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ती खोली गाठून त्या तिघांना ताब्यात घेतले. जालना कदीम ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या तिघांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कासोळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, कर्मचारी राऊत यांनी केली.
पालकांनी मानले पोलिस अन् ‘लोकमत’चे आभार
तिन्ही मुलं बेपत्ता झाल्यानंतर ‘लोकमत’ ग्रुपच्या वतीने राज्यातील सर्व ग्रुपवर तो मेसेज पाठविण्यात आला होता. त्या तिघांमध्ये ‘लोकमत’ परिवारातील संतोष मापारी यांचा मुलगा स्वराज असल्याचे लक्षात येताच शिर्डी येथील वार्ताहर प्रमोद आहेर यांनी तो संदेश शिर्डीतील विविध ग्रुपवर फिरविला होता. ती मुलं बुधवारी लॅपटॉपचे चार्जर घेण्यासाठी ग्लोबल कॉम्प्युटरमध्ये गेली होती. आहेर यांनी फिरविलेला संदेश आणि दुकानात आलेल्या मुलांचे चेहरे सारखे दिसत होते. त्यामुळे ग्लोबल कॉम्प्युटरचे चालक अनिल गोर्डे यांनी आहेर यांना बोलावून माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज पाहणीनंतर ते तिघे तीच मुलं असल्याचे समोर आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. याच दरम्यान चार्जिंगद्वारे लॅपटॉप सुरू करताच जालना पोलिसांनाही शिर्डीचे लोकेशन मिळाले. एकाच वेळी माहिती मिळाल्याने पथकाने शिर्डी गाठून त्या तिघांना ताब्यात घेतले. मुलं सापडल्याने पालकांनी पोलिस दल आणि ‘लोकमत’ परिवाराचे आभार मानले.
किरायाने केली रूम
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता तिघांनी जालना शहर सोडले. जालना ते छत्रपती संभाजीनगर, बीड बायपास मार्गे दुपारी २ वाजता ते शिर्डीत पोहोचले. शिर्डीतील मंदिर संस्थानच्या परिसरात जेवण केल्यानंतर सायंकाळी रूम शोधली. शिक्षणासाठी राहायचे असे सांगत एका वृद्धाकडे एक खोली तीन हजार रुपयांनी किरायावर घेतली. वृद्धाने पालकांविषयी विचारले असता आधार कार्ड दाखवित पालक दोन दिवसात येणार असल्याचे सांगून त्या वृद्ध व्यक्तीचीही दिशाभूल केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
म्हणतात करिअर करायला गेलो
१५ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झालेल्या मुलांशी पोलिसांनी संवाद साधला. त्यावेळी त्या मुलांनी आम्ही करिअर करण्यासाठी घर सोडल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिस व पालकांनी त्या मुलांची समजूत काढली आणि त्यांना जालना येथे आणण्यात आले.