अंतरवाली सराटीत आता ओबीसी आंदोलकांचेही उपोषण; जरांगेंवर निशाणा साधत म्हणाले,...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 04:22 PM2024-09-18T16:22:29+5:302024-09-18T16:22:54+5:30
मनोज जरांगे हे पॉलिटिकल अजेंड्यावर असल्याची टीका ओबीसी आंदोलकांनी यावेळी केली
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : अंतरवाली सराटी येथे आता ओबीसी आंदोलकांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगेश ससाणेसह पाच ओबीसी आंदोलकांनी सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी यासह अन्य मागण्या यावेळी केल्या. तसेच आंदोलकांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली.
अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दूसरा दिवस आहे. दरम्यान, अंतरवाली सराटीमध्येच सोनियानगर येथे मंगेश ससाणे यांच्यासह ओबीसी आंदोलकांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ''मनोज जरांगे पॉलिटिकल अजेंड्यावर आहेत. सत्तेत तीन पक्ष आहेत ते फक्त बीजेपीला टार्गेट करतात. जरांगे यांच्या मागण्यांना विरोध म्हणून आमचे उपोषण सुरू आहे. सरकारने एकाला जावई करू नये, अशी टिका यावेळी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी केली.
अंतरवाली सराटीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त
वडीगोद्री रोडवर अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायत हद्दीत हे उपोषण सूरु झाले आहे. एकीकडे मराठयांना ओबीसीतून आरक्षण द्यावे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण तर दुसरीकडे मंगेश ससाणे आणि आंदोलकांचे सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. दोन्ही उपोषणाची ठिकाणे अंतरवाली सराटी हद्दीत असल्याने वडीगोद्री व अंतरवाली सराटीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.