दावा ठाकरेंचा, उमेदवार पवारांचा; जालन्यात मविआच्या दोन तर महायुतीच्या एका जागेवर तिढा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:21 PM2024-10-25T16:21:10+5:302024-10-25T16:25:43+5:30
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत, यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता.
जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी दिवसेंदिवस चांगलीच पेटू लागली आहे. महायुतीत भाजपकडून तीन, शिंदेसेनेकडून एका जागेवरील उमेदवार घोषित करण्यात आला आहे, तर घनसावंगीतील उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. या ठिकाणी तिन्ही मित्रपक्षांनी दावा केला आहे. दुसरीकडे मविआतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगीतील उमेदवारांची घोषणा झाली. विशेष म्हणजे बदनापूरवर उद्धवसेनेचा दावा असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही जागा खेचली आहे.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत, यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. महायुतीकडून भाजपने भोकरदन, बदनापूर आणि परतूर हे तीन विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले, तर शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ सुटला आहे. घनसावंगीत हिकमत उढाण यांनी सीएम शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने ही जागा शिंदेसेनेकडे जाईल, असा दावा केला जात होता. परंतु, दोन दिवसांपासून घनसावंगीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे अपक्ष तयारी केलेले भाजपचे नेते सतीश घाटगे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून, ते मुंबईत गेल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेमुळे उढाण यांनीही मुंबई गाठली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही या जागेवर दावा सांगितला होता. महायुतीत भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी ही जागा कोणाकडे जाते हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील तीन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. उद्धवसेनेचा दावा असलेला बदनापूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेला असून, येथून रूपकुमार चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे. घनसावंगी मतदारसंघातून आ. राजेश टोपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी मिळाली आहे. मविआतील मित्रपक्ष उद्धवसेनेचा जिल्ह्यातील पाचही जागांवर दावा होता. विशेषत: बदनापूर, जालना, घनसावंगी (अंबड) येथे उध्दवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. परंतु, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी शरद पवार गटाकडे गेले आहे. जालन्यात काँग्रेसकडून आ. कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे परतूर कोणत्या पक्षाकडे जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
परतूरमध्ये होणार काय
परतूरमध्येही काँग्रेसकडून माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हे दावेदार असून, त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यामुळे उद्धव सेनेकडे परतूर विधानसभा मतदारसंघ गेला, तर काँग्रेसकडे जालन्याची जागा राहणार आहे. त्यामुळे मविआत उद्धवसेना आणि काँग्रेसला जिल्ह्यात प्रत्येकी एकच जागा मिळणार आहे. तशीच स्थिती शिंदेसेना आणि अजित पवार गटाची होणार असल्याची चर्चा रंगली आहे.