ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !
By विजय मुंडे | Published: March 28, 2024 07:30 PM2024-03-28T19:30:19+5:302024-03-28T19:30:56+5:30
जरांगेंच्या भूमिकेकडे नजरा; माविआची चर्चा संपेना अन् उमेदवारही ठरेना
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली. या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी ॲड. आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी थेट उमेदवारही जाहीर केले आहेत. जरांगेंशी चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वंचितचे उमेदवार जाहीर झाल्याने जिल्ह्यातील महायुती, माविआच्या गोटातही चलबिचल वाढली आहे. थेट होणारी लढत आता तिरंगी होणार की काय, अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते शहरी, ग्रामीण भागात कामाला लागले आहेत. या निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका परिणाम करणार यावर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीपासूनच अंदाज वर्तविले जात होते. त्यात माविआकडून कोणत्या पक्षाला जालन्याची जागा सुटणार आणि उमेदवार कोण राहणार हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यात आता जरांगे पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात अपक्ष उमेदवार देणे आणि सर्व जाती-धर्मातील उमेदवारांना संधी देण्याबाबत चर्चा केली. याबाबत गावा-गावांत बैठका घेऊन तेथील निर्णय आल्यानंतर ३० मार्च रोजी निर्णय जाहीर करू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
३० तारखेपर्यंत आमचा कोणालाही पाठिंबा नाही : जरांगे पाटील
आपण सर्व सूत्रे समाजाच्या हाती दिली आहेत. त्यामुळे समाजाच्या बैठकीतून जो निर्णय पुढे येईल, त्यानुसार आपण ३० तारखेला भूमिका स्पष्ट करणार आहोत. तोपर्यंत आपण कोणालाही पाठिंबा नाही आणि कोणताही उमेदवार नाही. आमच्या आंदोलनाला हलक्यात घेण्याची चूक केली. परंतु, आता निवडणुकीत आम्हाला हलक्यात घेण्याची चूक करू नका, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.