दानवे, काळेंमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा; बैठकांवर भर, लग्नसोहळ्यांतही हजेरी
By विजय मुंडे | Published: April 29, 2024 02:36 PM2024-04-29T14:36:07+5:302024-04-29T14:37:10+5:30
२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता.
जालना : २००९च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ८४८२ मतांनी पराभूत झालेल्या डॉ. कल्याण काळे यांनी यंदाच्या निवडणुकीतही रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. जालना लोकसभा मतदारसंघात ‘महायुती’चे रावसाहेब दानवे आणि ‘मविआ’चे कल्याण काळे यांच्यात अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्याची जणू स्पर्धा लागली आहे. या दोन्ही उमेदवारांनी दैनंदिन सकाळी ८ ते रात्री उशिरापर्यंत मतदारापर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विविध मित्रपक्षांसह संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशीही संवाद साधला जात आहे.
२००९च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना ३,५०,७१० तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना ३,४२,२२८ मते मिळाली होती. या निवडणुकीत काळे यांचा केवळ ८४८२ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना भाजपने सलग सहाव्यांदा उमेदवारी दिली आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाला तरी ‘मविआ’कडून कोणत्या पक्षाला जागा सुटणार आणि उमेदवार कोण राहणार? याची उत्सुकता कायम होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला जागा सुटली होती. परंतु, उमेदवार कोण राहणार? याचा प्रश्न कायम होता. उमेदवार जालना जिल्ह्यातील की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील? उमेदवार मराठा की ओबीसी? यावरही बरीच खल झाली. अखेर डॉ. काळे यांनाच पक्षाने संधी दिली. उमेदवारी जाहीर होताच दानवे आणि काळे यांनी मतदारसंघात बैठका, सभा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचा धडाका लावला आहे. उमेदवारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा सुरू असली तरी मतदार यंदा कोणाला संधी देणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
वंचित, बसपाही वाढविणार ‘बिपी’
यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाकर बकले, बसपाकडून निवृत्ती बनसाेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय इतर पक्षाचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी जोर लावला आहे. वंचित, बसपासह अपक्ष उमेदवारांमुळे मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा ‘बिपी’ वाढण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारांचा असा होता रविवार
रावसाहेब दानवे
‘महायुती’चे उमेदवार दानवे यांनी रविवारी सकाळी पीरपिंपळगाव, घाणेवाडी गावांतील मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर ब्राह्मण समाजाच्या वतीने जालन्यात आयोजित मुंजीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्यानंतर शेषमहाराज गोंदीकर, भगवानबाबा आनंदगडकर यांचीही भेट घेतली. सायंकाळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, सिंधी समाजासमवेत बैठक घेतली. मनोज महाराज गौड यांची मंदिरात भेट घेऊन रात्री वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
कल्याण काळे
‘मविआ’चे उमेदवार कल्याण काळे यांनी रविवारी सकाळीच जालना शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठिकठिकाणी लग्नसोहळ्यांना हजेरी लावली. या सोहळ्यात शुभेच्छा देतानाच निवडणुकीचा प्रचारही काळेंसह समर्थक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.