१५ वर्षांपासूनची सत्ता गेली; रावसाहेब दानवेंच्या तालुक्यात भाजपाच्या पॅनलचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 05:41 PM2023-11-06T17:41:45+5:302023-11-06T17:42:43+5:30
ईटा- रामनगरमधील ग्राम पंचायतमध्ये सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप बंडखोर एकत्र आले
भोकरदन : भोकरदन तालुक्यात दोन ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत ईटा/रामनगर ही ग्रामपंचायत गावविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. तर लतीफपूर/फुलेनगर ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.
भोकरदन तालुक्यात ईटा- रामनगर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत भाजपाचे द्यानेश्वर पुगळे यांची 15 वर्षांपासूनची सत्ता उखडून टाकली व गावविकास आघाडीच्या ताब्यात दिली आहे.रावसाहेब दानवे यांचा तालुका आणि याच मतदार संघात मुलगा आमदार असताना झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे.
लतीफपुर/फुलेनगर ग्रामपंचायतच्या सरपंच यांचे निधन झाल्याने त्याठिकाणी सरपंच पदाची पोटनिवडणुक झाली होती.
सोमवारी 6 रोजी तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता मतमोजणी झाली त्यात लतीफपुरच्या सरपंचपदी दिगंबर मुकींदा दाभाडे यांनी वैशाली सुरेश दाभाडे यांचा पराभव केला. दिगंबर दाभाडे यांना 534 मते पडली तर वैशाली दाभाडे यांना केवळ 89 मतावरच समाधान मानावे लागले.
तर ईटा/रामनगर ग्रामपंचायतच्या 9 सदस्य पदासाठी निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी प्रस्थापिताविरुद्ध पॅनल तयार करून निवडणूक लढवत सात जागा जिकल्या.तर भाजपाच्या पॅनलला केवळ दोन जागा जिंकता आल्या. प्रयागबाई वनार्से यांना 736 मते मिळाली असून त्या सरपंचपदी निवडून आलेल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता ज्ञानेश्वर पुगळे यांना 532 मते मिळाली आहेत. तर सदस्यपदी प्रभाग क्रं 1 मधून हरिदास जाणू वनार्से, मनोज शिवाजी वनार्से, कोमल योगेश वनार्से, तर प्रभाग क्रं 2 मधून नारायण रामकृष्ण वनार्से, जयश्री स्वप्नील पुगळे, मीरा बाळकृष्ण वनार्से, तर प्रभाग क्रं 3 मधून सुनील गणेश वनार्से, सविता कृष्णा कांबळे, मनीषा किशोर वनार्से हे नऊ सदस्य विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ई. गायकवाड, आर. आर. पडोळ, तर सहाय्यक म्हणून के. जी. पडोळ, के. एस. गिरणारे यांनी काम पाहिले. तसेच एस. पी. कदम, आर. डी. देशपांडे, एस. एस. तायडे, गणेश सपकाळ, आर. एन. सानप आदींनी मतमोजणी कामात परिश्रम घेतले.