‘पाणीदार’ बॅचचा दीक्षांत समारंभ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:22 AM2019-12-26T01:22:40+5:302019-12-26T01:22:45+5:30
५०० पेक्षा अधिक जवानांनी गेल्या उन्हाळ्यामध्ये श्रमदान करून पोलीस प्रशिक्षण केंद्राचा जवळपास १०० एकरचा परिसर पाणीदार केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील आज ज्यांनी आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ते जवळपास ५०० पेक्षा अधिक जवानांनी गेल्या उन्हाळ्यामध्ये श्रमदान करून पोलीस प्रशिक्षण केंद्राचा जवळपास १०० एकरचा परिसर पाणीदार केला आहे. त्यामुळे या बॅचचा उल्लेख पाणीदार बॅच म्हणून करावा लागेल, असे कौतुकास्पद उद्गार पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नामदेव चव्हाण यांनी काढले.
बुधवारी सकाळी ९४ व्या दीक्षांत समारंभाचे पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक हे होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक अक्षय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक एम.के. राठोड, कारागृह अधिक्षक अरुणा मुगुटराव, तहसीलदार प्रशांत भुजबळ, उद्योजक डॉ. वळसंघकर, डॉ. कैलास सचदेव, उद्योगपती शिवरतन मुंदडा, जितेंद्र अग्रवाल आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्राचार्य नामदेव चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राने गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी न्यायाधीश वेदपाठक यांनी पोलीस प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत त्यांनी गेल्या वर्षभरात श्रमदानातून केलेल्या क्रांतीबद्दल त्यांचे स्वागत केले. याच कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आल.
पोलीस कवायतीचे नेतृत्व शुभम गिरी यांनी केले तर परेड कमांडर म्हणून भास्कर गोडसे यांनी केले. कवायतीनंतर प्रशिक्षणाच्या कालावधीत गोविंद भांगे यांना अष्टपैलू प्रशिणार्थी म्हणून बक्षीस देण्यात आले. कवायत प्रकारात ऋषिकेश कांबळे यास पारीतोषिक देण्यात आले. तर कमांडर प्रकारात कडुबा म्हस्के यांचा गौरव करण्यात आला. शरीरसौष्ठव प्रकारात राहुल अदलिंगे यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. अंतरवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणून समाधान गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुरा भास्कर यांनी केले.