देशातील पहिल्या व्हर्चुअर सायन्स लॅबचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:44 AM2018-02-22T00:44:47+5:302018-02-22T00:45:12+5:30
हॉर्वर्ड, कॅब्रिंज, डॅनिश, एमआयटी संस्थेसह अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधन करुन तयार केलेल्या व्हर्चुअल प्रयोगशाळेचे जालन्यात बुधवारी उदघाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हॉर्वर्ड, कॅब्रिंज, डॅनिश, एमआयटी संस्थेसह अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधन करुन तयार केलेल्या व्हर्चुअल प्रयोगशाळेचे जालन्यात बुधवारी उदघाटन करण्यात आले. रोटरी क्लब आॅफ जालना मिडटाऊनच्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशातील ही पहिलीच प्रयोगशाळा असेल, असा दावा रोटरी क्लबच्या पदाधिका-यांनी केला आहे.
जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात बुधवारी या प्रयोगशाळेचे उदघाटन रोटरी आंतरराष्ट्रीयचे माजी अध्यक्ष आणि रोटरी फाऊंडेशनचे विश्वस्त कल्याण बॅनर्जी व व्यंकटेश सी. हण्णा यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अनुप करवा यांच्या संकल्पनेतून व्हर्चुअल प्रयोगशाळेचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांत ई-लर्निंगसह विज्ञान विषयाबाबत आवड निर्माण होणार आहे. विज्ञान आणि इतर विषयांतील जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याचे काम या प्रयोगशाळेत होणार असल्याचे बॅनर्जी म्हणाले. माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प वा उपक्रम राबविला जात आहे. यातून विद्यार्थी अधिक सक्षम होऊन यातून अनेक शास्त्रज्ञ घडू शकतील, असे बॅनर्जी म्हणाले.
डॉ. अनुप करवा म्हणाले की, या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना भौतिक घडामोडींचे निरीक्षण करता येणार आहे. वारंवारता आणि सातत्य पद्धतीने हे अनुभवता येऊ शकणार आहे. तसेच यातून विद्यार्थ्यांना संवाद आणि चेह-यांच्या हावभावांवरुन प्रयोगाचा अभ्यास करु शकणार आहेत. मुंबईत जवाहरलाल नेहरु प्लॅनेटोरियमप्रमाणेच या प्रयोगशाळेचा अनुभव विद्यार्थी घेऊ शकतील. आगामी काळात संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवून देशाच्या उभारणीत योगदान देण्याचा मानस मान्यवरांनी बोलून दाखवला. या कार्यक्रमास शहरातील विविध शाळांतील एक हजार विद्यार्थ्यांसह शिक्षक, रोटरी परिवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.